आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नंदुरबार-अमळनेर दरम्यान 20 टवाळखोरांनी रेल्वे बोगी लुटली; नऊ संशयित ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मोहरमच्या निमित्ताने नंदुरबार येथे उरूससाठी गेलेल्या सुमारे २० टवाळखोरांनी हावडा-पोरबंदर एक्स्प्रेमध्ये परतीच्या प्रवासात चाकू, गावठी कट्ट्याचा धाक दाखवून थेट रेल्वे बोगीतील प्रवाशांना लुटल्याची खळबळजनक घटना सोमवारी मध्यरात्री नंदुरबार ते अमळनेर दरम्यान घडली. मंगळवारी रात्री ११ वाजता अमळनेर, नंदुरबार, भुसावळ येथील लोहमार्ग पोलिसांची पथके जळगावात तपासासाठी आल्यानंतर त्यांनी शनिपेठ, काट्याफाइलसह इतर भागातील नऊ संशयितांना शहर पोलिस ठाण्याच्या पथकाच्या मदतीने अटक केली. अन्नू अलीम (चापल्या) असे संशयितांची नावे आहेत. 

जळगाव, भुसावळ चाळीसगाव येथील चोरटे, घरफोड्यांनी नंदुरबार येथे एकत्र येऊन रेल्वे लुटण्याची याेजना अाखली होती. उरूसच्या निमित्ताने त्यांनी रविवारचा दिवस नंदुरबारमध्ये घालवला. ठरल्याप्रमाणे सर्वजण रात्री नंदुरबार स्थानकावर आले. सुमारे २० भामट्यांनी हावडा-पोरबंदर एक्स्प्रेमध्ये एकाच बोगीतून प्रवासाला सुरुवात केली. प्लॅनिंगनुसार बोगीच्या दोन्ही टोकांपर्यंत त्यांनी आपापल्या पोझिशन घेतल्या. रेल्वे नंदुरबार शहरापासून काही किलोमीटर पुढे येताच टवाळखोरांनी दोन्ही बाजूंनी हल्लाबोल केला. झोपेत असलेल्या प्रवाशांच्या मानेवर सुरा ठेवत तसेच गावठी कट्ट्याचा धाक दाखवून त्यांनी सुमारे ३० पेक्षा जास्त मोबाइल, रोख रक्कम, दागिने असा ऐवज ताब्यात घेण्यास सुरुवात केली. एकाच वेळी झालेल्या हल्ल्यामुळे कोणत्याही प्रवाशाला फोन करून ही माहिती बाहेर देता आली नाही. प्रत्येक सीटजवळ एक-दोन टवाळखोर हातात सुरा, कट्टा घेऊन प्रवाशांना धमकावत होते. त्यामुळे भयभीत झालेल्या प्रवाशांनी मोबाइल तसेच पैसे काढून त्यांच्या हातात ठेवले. अमळनेर स्थानकाजवळ आल्यानंतर त्यांनी चेन ओढून रेल्वेची गती कमी होताच उड्या मारून धूम ठोकली. त्यानंतर काही प्रवाशांनी मिळेल त्या माध्यमातून नातेवाईक, पोलिसांशी संपर्क साधून आपबीती कथन केली. याप्रकरणी नंदुरबार, अमळनेर भुसावळ अशा तिन्ही ठिकाणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात मंगळवारी दिवसभर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते. 

चारफिर्यादी आले समोर, चोरट्यांनाही लुटले 
चोरट्यांनीमाजवलेल्या दहशतीनंतर अनेक प्रवाशांना धडकी भरली होती. परंतु मंगळवारी दिवसभरात चार प्रवाशांनी वेगवेगळ्या ठिकाणी फिर्याद देऊन गुन्हे दाखल केले आहेत. चाेरट्यांची ही टोळी जळगावसह इतर ठिकाणाहून एकत्र आली होती. त्यामुळे चोरी केलेल्या मालाची अापसात वाटणीदेखील झालेली नव्हती. रेल्वेचा वेग कमी होताच मिळेल त्या मार्गाने लुटलेल्या ऐवजासह सर्व चोरटे पसार झाले होते. अखेर शहर पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर इतरांची नावे समोर आली. दरम्यान, आपण चोरलेला मालदेखील आणखी काही भामट्यांनी लुटून नेल्याची माहिती अटक झालेल्या दोघांनी पोलिसांना दिली होती. मंगळवारी रात्रभर पोलिसांचे अटकसत्र सुरूच होते. 

दोघांनी सांगितली इतरांची नावे 
याघटनेची माहिती मंगळवारी दिवसभरात नंदुरबार अमळनेर शहरात पसरली होती. परंतु हे चोरटे कोण आहेत? याचा थांगपत्ता पोलिसांना, लोहमार्ग पोलिसांना नव्हता. अखेर मंगळवारी रात्री ११ वाजता नंदुरबार भुसावळ येथील लोहमार्ग पोलिसांची पथके जळगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली. पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर गुन्हे शोध पथकाच्या साहाय्याने संशयितांची ओळख पटवण्यात आली. शहर पोलिसांच्या पथकाने अन्नू चापल्या यांना रात्री ११.३० वाजता काट्याफाइल येथील त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. दोघांकडून चार मोबाइल, रोख रक्कम एक चाकू जप्त करण्यात आला. दोघांना पाेलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी आणखी १८ ते २० चोरट्यांची नावे सांगितली. परंतु काहींचे पूर्ण नाव, पत्ते माहित नसल्याने केवळ तोंड ओळख असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. 
बातम्या आणखी आहेत...