आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापी नदीपात्रातील बंधारा शनिवारी भरणार; आता 50 ऐवजी 20 टक्के पाणीकपात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - हतनूरचे आवर्तन तापी पात्रातील वरच्या बंधा-यात शुक्रवारी पोहोचले. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या बंधा-याची जलपातळी तीन फुटांनी तर खालच्या बंधा-यांची जलपातळी सहा इंचांनी वाढली. शहरात मंगळवारपासून 20 टक्के पाणीकपात करून रोटेशनप्रमाणे पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

पालिकेने पाटबंधारे विभागाकडे एक हजार क्युसेस आवर्तनाची मागणी केली होती. यानुसार धरणातून 11 जूनला आवर्तन सोडण्यात आले. परंतु ते तापीतील पालिकेच्या बंधा-यापर्यंत पोहोचलेच नाही. यादरम्यान धरणातील राखीव साठ्याची जबाबदारी जिल्हाधिका-यांकडे गेल्याने आवर्तन सोडण्याचा विषय लांबणीवर पडला होता. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाठपुरावा झाल्यानंतर बुधवारी रात्री 8.30 वाजता आवर्तन सोडल्याने शुक्रवारी संध्याकाळपर्यंत खालच्या बंधा-याची जलपातळी सहा इंचांनी वाढली.

पाण्याचा अपव्यय टाळण्याचा सल्ला
शहरात पाणीकपात असताना विस्तारित भागात मात्र पाण्याची नासाडी सुरू असल्याचे चित्र प्रकर्षाने समोर येत आहे. जवळपास 80 टक्के नळांना तोट्या नसल्याने पाण्याची नासाडी होत आहे. पालिकेने सर्वेक्षण करून ज्या घरासमोरील नळाला तोट्या नसतील, अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे पाऊल उचलावे, असा सूर उमटत आहे.

दीपनगर प्रशासनाकडून बनवाबनवी
दीपनगरऔष्णिक वीजनिर्मिती केंद्राचे जुन्या संचाचे पाणी आरक्षित आहे. परंतु सध्या हतनूर धरणातून आरक्षणापेक्षा जास्त जलसाठा उचलला जात आहे. सध्या भुसावळ शहरासाठी आवर्तन सोडण्यात आले. मात्र, दीपनगर केंद्राने त्यांच्या बंधा-याचे गेट बंद केल्याने पाणी पुढे सरकत नसल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे.

दीपनगरच्या बंधा-यामुळे पाणी अडले
- दीपनगर प्रकल्पाच्या बंधा-याचे गेट बंद झाल्याने पालिकेच्या बंधा-यात पुरेसे पाणी पोहोचले नाही. मात्र, शनिवारी सकाळपर्यंत बंधारा पूर्ण क्षमतेने भरेल. उपलब्ध साठा 21 दिवसांपर्यंत पुरवण्यासाठी 30 टक्के पाणीकपात करावी लागेल. ए. बी. चौधरी, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग, नगरपालिका, भुसावळ

आदेश मिळाल्यास पुन्हा आवर्तन
- हतनूर धरणातून भुसावळ शहरासाठी एक हजार क्युसेस प्रतिसेकंद वेगाने आवर्तन सोडण्यात आले आहे. जिल्हाधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसार हे आवर्तन दिले. त्यांनी पुन्हा आदेश दिल्यास आवर्तन सोडण्यात येईल. एस. आर. पाटील, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग