आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 22 Teachers Absent Training Course Issue At Jalgaon

अभ्यासक्रम प्रशिक्षणाला 22 शिक्षकांची दांडी !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - इयत्ता तिसरीच्या नवीन विषयांच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षणाकडे 22 शिक्षकांनी पाठ फिरवली. त्यामुळे प्रशिक्षणास उपस्थित न राहणा-या शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश शासनाने दोन दिवसांपूर्वीच काढले आहेत. मात्र, अशा प्रकारांकडे प्राथमिक शिक्षण विभागाकडून डोळेझाक केली जात असली तरी, याबाबतचा अहवाल डाएट मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण आयुक्तांना देणार आहे.

येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता तिसरी आणि चौथीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमात बदल होणार आहे. त्यामुळे तिसरीच्या अभ्यासक्रमाचे विषयनिहाय जिल्हास्तरीय प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत देण्यात आले. त्याचा समारोप शुक्रवारी झाला. राज्यस्तरीय प्रशिक्षणात प्रशिक्षण घेतलेले डाएटचे सी.डी.साळुंखे व योगेश सोनवणे यांच्यासह चौघांनी प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणासाठी 120 शिक्षकांना बोलावण्यात आले होते; परंतु 98 शिक्षकांनीच प्रशिक्षण घेतले, तर 22 शिक्षकांनी याकडे पाठ फिरवली. एकीकडे शासन गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे ज्ञान देणारे शिक्षकच अशा प्रशिक्षणाकडे पाठ फिरवत आहेत. तसेच याबाबत शासनाच्या आदेशाकडेही डोळेझाक केली जाते असून, शिक्षण विभागाचेही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवून प्रशिक्षणाला शाळेचा प्रतिनिधी पाठवा, हे सांगण्यासह प्रशिक्षणाला आलेल्या शिक्षकांची यादी तयार करून त्यांना मानधन देणे एवढीच कार्यवाही शिक्षण विभाग करत आहे.

या प्रशिक्षणाबाबत मुक्ताईनगर तालुक्यातील शिक्षक निरुत्साही दिसून आले. प्रत्येक तालुक्यातील शिक्षकसंख्येच्या आधारावर प्रशिक्षणासाठी शिक्षकांची नियुक्ती केली जाते. डाएटला या प्रशिक्षणासाठी किमान 120 शिक्षक येण्याची अपेक्षा होती. त्यामुळे मुख्याध्यापकांनी पाठवलेला शिक्षक आला का नाही? याविषयी गटशिक्षणाधिका-यांकडून शिक्षणाधिका-यांनी आढावा घेणे आवश्यक आहे.

पायाभूत प्रशिक्षण, पदोन्नतीनंतरचे प्रशिक्षण आणि उजळणी प्रशिक्षण, बदलीनंतरचे प्रशिक्षण व नवीन विषयाची तोंडओळख यासाठी प्रशिक्षणास नियुक्त केलेले कर्मचारी व शिक्षकांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्रशिक्षणासाठी कर्मचा-यांचे नावे न देणा-या विभागप्रमुखांसह नावे दिल्यानंतर प्रशिक्षणाला उपस्थित न राहणा-यांवर कारवाई करण्याचा अध्यादेशही काढण्यात आला आहे.

असा आहे प्रशिक्षण कार्यक्रम
इयत्ता चौथीच्या विषयांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण 2 ते 6 जूनदरम्यान होईल. त्यात मराठी माध्यमाचे डाएट येथे, तर उर्दू माध्यमाचे इकरा उर्दू हायस्कूल येथे होईल. तसेच तालुकास्तरावर इयत्ता तिसरीचे 9 ते 13 जून आणि चौथीचे 16 ते 20 जूनदरम्यान प्रशिक्षण होणार आहे. इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांचे प्रशिक्षण नाशिक येथे होणार आहे.