आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामनेर तालुक्यातील 23 हजार मतदारांवर गंडांतर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर - मतदार यादीत फोटो नसल्याच्या कारणावरून जामनेर तालुक्यातील 23 हजार मतदारांवर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपली नावे कमी होऊ नयेत, यासाठी मतदार यादीत फोटो नसलेल्यांनी तत्काळ प्रगणक (बीएलओ) शी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार आर.डी.कोळी यांनी केले आहे. शासनाच्या निष्काळजीपणामुळे मतदारांना पुन: पुन्हा फोटो जमा करावे लागत आहे. तसेच तेच ते काम पुन्हा करावे लागत असल्याने कर्मचारीही वेठीस धरले जात आहेत.

जामनेर तालुक्यात एकूण 2,41,995 मतदार आहेत. पैकी 23057 मतदारांचे मतदार यादीत फोटो नाहीत. मतदार यादीत फोटो नसलेले मतदार बोगस असल्याचा संशय असल्याने अशा मतदारांना त्यांचे फोटो तत्काळ आपापल्या प्रगणक (बीएलओ) कडे जमा करावे अन्यथा मुदतीत फोटो न मिळालेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जातील, असा फतवाच शासनाने काढला आहे. वास्तविक यापूर्वीही मतदारांनी आपापले फोटो मतदार नोंदणी अधिकार्‍यांकडे जमा केले होते. मात्र सर्वच जिल्ह्यातून राज्य पातळीवर पोहचलेले फोटो नियोजन नसल्याने एकत्र झाले. त्यामुळे कोणत्या तालुक्याचे फोटो कोणते आहेत? हे ओळखणे अशक्य झाले. त्यामुळे काही मतदारांच्या फोटोशिवायच याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. आता मात्र शासनाने पुन्हा फतवा काढून मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांना फोटो जमा करण्याबाबत सूचीत केले आहे.

मतदार याद्यांमध्ये फोटो नसलेल्या मतदारांनी आपले फोटो लवकरात लवकर संबंधित बीएलओंकडे जमा करावे. ज्या मतदारांचे फोटो जमा होणार नाहीत, अशा मतदारांची नावे यादीतून वगळली जातील. याकरिता मतदारांनी सहकार्य करावे. आर.डी.कोळी, तहसीलदार जामनेर