जळगाव - महापालिकेच्या फुले मार्केटमधील एल पट्ट्याच्या उत्तरेस बांधण्यात आलेल्या सुलभ शौचालयांवर दुकाने काढण्यात आली आहे. या दुकानांचा नियमबाह्य वापर तसेच अटी शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांना 24 तासात पालिकेची मालमत्ता मोकळी करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच मार्केटमधील जिन्याखाली आणि इतर ठिकाणी असलेल्या अतिक्रमणधारकांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
फुले मार्केटमध्ये येणा-या ग्राहकांच्या सोयीसाठी पूर्व उत्तर बाजूला सुलभ शौचालये बांधण्यात आली आहेत. त्यानंतर 2000 साली नगररचना विभागाची परवानगी न घेता केवळ बांधकाम विभागाच्या परवानगीने या शौचालयांच्या पहिल्या व दुस-या मजल्यावर दुकाने काढण्यात आली आहेत. ही परवानगी देताना संबंधितास ही दुकाने भाडेपट्ट्याने देता येणार नसल्याचे स्पष्ट असतानाही किशोर पंजू मरसाळे यांनी आपले दुकान प्रदीप जाधवाणी यांना भाड्याने दिले आहे. नोटीस बजावूनही संबंधितांकडून प्रतिसाद न मिळाल्याने शुक्रवारी मरसाळे यांना 24 तासात आपले साहित्य काढून घेण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत संबंधितांनी अतिक्रमण काढून न घेतल्यास पालिकेचे पथक कारवाई करेल.
जागा मिळेल तेथे दुकाने
फुले मार्केटच्या पूर्व उत्तर कोप-यातील टॉयलेटमध्ये दुकान थाटलेल्या लोकेश अनिल भगत यांना पालिकेची मालमत्ता मोकळी करून देण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच जिन्याखाली नूर मोहम्मद रोशन खान यांनी दुकान थाटले असून ते दुकान प्रदीपकुमार सुरेंद्र जैन यांना भाड्याने दिले आहे. दुस-या एका जिन्याखाली अब्दुल रशीद शेख अकबर यांचेही दुकान आहे. या सर्वांना नगररचना विभागातर्फे शुक्रवारी नोटीस बजावली आहे.