आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला बोगीतून प्रवास करणार्‍या 267 जणांना पकडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रेल्वेत महिलांच्या डब्यातून प्रवास करणार्‍यांवर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी लक्ष केंद्रित केले आहे. 6 ते 13 आॅगस्टदरम्यान राबवलेल्या विशेष मोहिमेत जळगाव स्थानकावर 267 प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर घेत केंद्र शासनातर्फे रेल्वे सुरक्षा बलाकडून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. धावत्या रेल्वेत होणारे अत्याचार रोखण्यासाठी महिलांच्या डब्यात शिरलेल्या पुरुषांना चाप बसावा, या उद्देशाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम कायम सुरू राहणार आहे. एका आठवड्यात कलम 162नुसार 267 प्रवाशांवर कारवाई झाल्यानंतर आता अपराध नियम मोडणार्‍यांच्या संख्येत घट झाली आहे. या दोषी प्रवाशांकडून 26 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
42 हजार 800 रुपयांचा दंड
केवळ महिलांच्या बोगीत प्रवास करणार्‍यांकडून 26 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला. शिवाय आरक्षण न करता आरक्षित डब्यातून प्रवास करणार्‍या 38 प्रवाशांकडून कलम 155नुसार 3 हजार 800 रुपये, अनधिकृतपणे खाद्यपदार्थ विक्री करीत रेल्वे रूळ ओलांडणार्‍या 39 जणांकडून कलम 144 (अ) व 147नुसार 11 हजार 700 आणि रेल्वेत भिक मागणार्‍या दोघांकडून 600 रुपये असा एकूण 42 हजार 800 रुपयांचा दंड सात दिवसांत वसूल करण्यात आला आहे."

मद्यपींचा महिला प्रवाशांना त्रास
रेल्वेस्थानकाच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी दारूडे आणि गांजा पिणार्‍यांचा त्रास महिला प्रवशांना सहन करावा लागत आहे. जिन्याच्या खाली, शौचालयाजवळ या दारुड्यांनी अड्डे तयार करून ठेवले आहेत.
गुन्हे जास्त आणि कारवाई कमी
रेल्वेस्थानकावर हजारो लोकांचा दररोज वावर असतो. मात्र, जळगाव रेल्वे सुरक्षा बलाकडे केवळ 40 कर्मचार्‍यांचा फौजफाटा आहे. तर 53 किलो मीटरपर्यंतच्या रेल्वे रुळाची त्यांची हद्द आहे. त्यामुळे मनुष्यबळ अपुरे पडत असल्याची स्थिती आहे. याचा थेट परिणाम कारवाईच्या प्रमाणावर होत आहे. आता विशेष मोहिमेमुळे सातच दिवसांत 267 जणांवर कारवाई करण्यात आली. ऐरवी मात्र ऐवढी कारवाई होत नाही. त्यामुळे मनुष्यबळ वाढवणे गरजेचे बनले आहे.
चांगला बदल जाणवतोय
४महिलांच्या सुरक्षेच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही कारवाई कायम सुरू ठेवणार आहोत. कारवाई सुरू असल्यामुळे आता सकारात्मक बदल जाणवत आहे.
व्ही.के.लांजीवार, प्रभारी निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल, जळगाव