आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपावर २७५ कोटींचे कर्ज, आमदारगोटे यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - महापालिकेवर २७५ कोटी रुपयांचे कर्ज असून, ते अमरावती महापालिकेप्रमाणे माफ करावे, अशी मागणी शासनाकडे केली आहे. तसेच महापालिकेची विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी गृहविभागातून डाॅ.नामदेव भोसले यांची आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे महापालिकेची स्थिती सुधारल्याशिवाय त्यांना कोणीही हटवू शकत नाही, असे स्पष्ट करत आमदार अनिल गोटे यांनी आयुक्त डॉ.भोसले यांची पत्रकार परिषदेत पाठराखण केली.
या वेळी आमदार गोटे म्हणाले की, महापालिकेवर २७५ काेटी रुपयांचे कर्ज आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांत एक रुपयाचे कर्जदेखील फेडण्यात आलेले नाही.महापालिकेला मदत करताना शासनाला विचार करावा लागताेय. आघाडी शासनाच्या काळात अनेकदा निधी मंजूर झाल्याच्या वल्गना सत्ताधा-यांनी केल्या. परंतु, महापालिकेला एक पैसाही मिळाला नाही. महापालिकेत गेल्या काही महिन्यांपासून केलेल्या कामांची बिले काढणे, चुकीच्या पद्धतीने बोगस कामे करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आर्थिक स्थिती सुधारण्याऐवजी अधिक बिकट कशी होईल, याचाच विचार काही जण करत आहेत. त्यामुळे महापालिकेची स्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी डाॅ.भोसले यांची आयुक्तपदी नियुक्ती केली असल्याचे त्यांनी सांगितले.

देव होस्टेलच्या जागेवर पुनर्वसन
जेलरोडवरील अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन या भागातील देव होस्टेलच्या जागेवर करण्यास मुख्यमंत्र्यांनी संमती दर्शवली आहे. जेल रोडवरील अतिक्रमणे आमदार गोटेंमुळे काढण्यात आल्याचा आरोप काहींनी केला आहे. परंतु, तो चुकीचा असून, सिंधी बांधवांच्या पुनर्वसनाचा मुद्दा लावून धरला आहे. त्यांना सरकारी जागा मिळावी यासाठी प्रथम सहकारी संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेचे २४८ सदस्य आहेत. पुनर्वसनात या सदस्यांचा प्रामुख्याने विचार होईल. यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन जागा कशी घ्यायची, पुनर्वसन कसे करायचे आदी मुद्यांवर चर्चा होणार असल्याचेही आमदार गोटे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारावर का बोलत नाहीत?
पाणीपुरवठायोजनेच्या बिलावरून झालेल्या वादाबाबत बोलताना आमदार गोटे म्हणाले की, ही योजना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काळात मंजुर झाली. तिचा ठेकाही तेव्हाच दिला गेला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत बोलता केवळ आयुक्तांनी मंजूर केलेल्या बिलाबद्दलच अधिक का बोलले जात आहे? असा प्रश्न उपस्थित केला. योजनेचे काम चांगले व्हावे यासाठी ही योजना जीवन प्राधिकरणकडे सोपवण्याची मागणी केली असून, या योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार असल्याचे आमदार गोटे म्हणाले. यापूर्वी महापालिकेत झालेल्या कामांची चौकशी करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. त्याचबरोबर आतापर्यंत किती रक्कम काढण्यात आली आहे? ती कुठे खर्च झाली? याचीही चौकशी केली जाईल. ज्यांनी सध्या महापालिकेत याबाबत रान उठवले आहे, त्यांनी मागील काळातील बिलांचीही चौकशी करावी.
महापालिकेच्या माध्यमातून मंजुरी नसताना ५२ काेटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत. या प्रकारामुळे महापालिकेची स्थिती खराब झाली आहे. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ साधल्याशिवाय महापालिकेच्या परिस्थितीत सुधारणा होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आयुक्त डाॅ.भोसले आल्यानंतर काही प्रमाणात उत्पन्नात वाढ झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
बातम्या आणखी आहेत...