आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नियंत्रण सुटलेल्या टँकरने अाईसह 4 लेकरांना चिरडले; जळगाव जिल्ह्यात भीषण अपघात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्ताईनगर - गावोगावी फिरून तुळशी अाणि रुद्राक्षमाळा विक्री करणाऱ्या कुटुंबातील पाच जणांना टँकरने चिरडले. ही घटना रविवारी सकाळी ८.३० वाजता जळगाव जिल्ह्यातील घोडसगाव-चिखली फाट्यादरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर घडली. मृतांमध्ये अाईसह दोन मुले, एक मुलगी आणि १३ महिन्यांच्या बालकाचा समावेश आहे.  चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.    


हलखेडा (ता.मुक्ताईनगर) येथील गोधम दासभाऊ पवार (फासेपारधी) हे कुटुंबासह गावोगावी फिरून माळा विक्री करून उदरनिर्वाह भागवतात. शनिवारी पवार कुटुंबीय घोडसगाव येथे आले होते. रविवारी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास ते घोडसगावच्या पुढे असलेल्या चिखली गावाकडे पायी जात होते. वाटेत घोडसगाव-चिखली रस्त्यावरील गजानन हॉटेलजवळ मुक्ताईनगरकडून मलकापूरकडे जाणाऱ्या केमिकलच्या टॅँकरने (एमएच०६-एक्यू९९९७) पवार कुटुंबातील सर्वांना धडक दिली. अपघातात पवार यांच्या पत्नी निन्नेबाई गोधम पवार(३८), मुलगा अलकोस पवार (८), मुलगी उडदीश पवार (६) आणि १३ महिन्यांचा नवजात बालक अमरसिंग गोधम पवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर स्वत: गोधम पवार, त्यांचा मुलगा निहाल पवार (१२) आणि मुलगी निहालनी पवार (१०) हे तिघे जखमी झाले. जखमींना तत्काळ मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, निहाल पवार या बालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी गोधम पवार यांच्या फिर्यादीवरून टॅँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन इंगळे करत आहेत. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा बँक अध्यक्षा ॲड.रोहिणी खडसे- खेवलकर, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य जयपाल बोदडे, रमेश ढोले, राजू माळी, छोटू भोई, मनोज तळेले यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.   

 

 

पळून जाणाऱ्या टँकरचालकाला लाेकांनी पकडले  

या भीषण अपघातानंतर वाहन घटनास्थळावर सोडून टँकरचालक आशिषकुमार गौड (रा.प्रतापगड, उत्तर प्रदेश) पसार होण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, परिसरातील नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनास्थळाचे दृश्य पाहून उपस्थितांचे मन हेलावले. रुग्णालयातील आक्रोशामुळे सर्वच जण सुन्न झाले हाेते.

बातम्या आणखी आहेत...