आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाच्या कानशिलात लगावून लांबवला मोबाइल; मुलीकडूनही चोरण्‍याचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मोबाइलवर बोलत पायी चालणाऱ्या युवकाच्या कानशिलात लगावून हातातील २० हजार रूपये किमतीचा मोबाइल हिसकावून नेल्याची घटना शनिवारी रात्री ८.४५ वाजता बाहेती महाविद्यालया समोर घडली. दुचाकीस्वार भामट्यांनी युवकासह एका मुलीच्या मानेला झटका देत तिचाही मोबाइल पळवण्याचा प्रयत्न केला होता.

बाहेती महाविद्यालयातील बारावीचे विद्यार्थी दीपक जाधव कृपाल राजपूत हे दोघे शनिवारी महाविद्यालयाच्या आवारातील जीममधून रात्री ८.४५ वाजता घरी जाण्यासाठी निघाले होते. या वेळी दीपक हा मोबाइलवर बोलत होता. तर कृपाल शेजारी चालत होता. काही सेकंदातच दोघांच्या समोरून एक भरधाव दुचाकी आली. त्यावर बसलेल्या दोन भामट्यांनी दीपकच्या कानशिलात लगावत हातातील मोबाइल हिसकावून धूम ठोकली. दोघांनी आरडा-ओरड केली; परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. यानंतर परिसरात आणखी काही तरुण गोळा झाले होते. याच भामट्यांनी या घटनेच्या आधी एका तरुणीच्या हातातील मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. त्या तरुणीने विरोध केल्यानंतर त्यांनी तिच्या मानेला झटका दिला; परंतु मोबाइल जमिनीवर कोसळल्यामुळे भामट्यांनी पळ काढला होता. दीपक याने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. तर अनेकदा मणियार विधी काॅलेज जवळच्या मैदानावर टवाळखोर गैरप्रकार करतात.
 
भामट्यांना अंधाराचा फायदा
ख्वाजामियाँदर्गा ते बाहेती महाविद्यालयादरम्यानचा रस्त्यावर शुकशुकाट असतो. पथदिवे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी या भागातून जाणाऱ्या पादचाऱ्यांना भीती वाटत असते. याच अंधाराचा फायदा घेत भामट्यांनी पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. या मार्गावर चार मोठी महाविद्यालये, एक शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांची वर्दळ असते. सायंकाळी, रात्रीच्या वेळी विद्यार्थ्यांच्या हातून माेबाइल हिसकावणे, दमदाटी करण्याच्या घटना घडत आहेत. पोलिसांनी गस्ती वाढवण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
बातम्या आणखी आहेत...