आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळमधील न्यायालयाच्या नूतन इमारतीमध्ये निघाल्या होत्या 32 त्रुट्या!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - अतिरिक्त सत्र न्यायालय आणि वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाच्या कामकाजास परवानगी मिळाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान, न्यायालयासाठी उभारलेल्या इमारतीची जिल्हास्तरावरील न्यायाधीशांनी पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाला 32 त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या आठवड्यात किरकोळ पण महत्त्वपूर्ण त्रुटी दूर करून इमारत न्याय विभागाकडे हस्तांतरित होणे शक्य आहे.

शहरातील वकिलांच्या तिन्ही संघटनांनी अतिरिक्त सत्र न्यायालय आणि वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे कामकाज सुरू व्हावे, यासाठी लढा दिला. मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिल्याने 20 वर्षांपासून रखडलेली मागणी पूर्ण झाली. अतिरिक्त सत्र आणि वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयासाठी नूतन इमारतीचा वापर करावा. तालुका न्यायालयाचे काम नूतन इमारतीमधून नको, असा पवित्रा वकिलांच्या संघटनेने घेतला होता. कामकाजाला मंजुरी मिळाल्यानंतर न्याय विभागाने नवीन इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. जळगाव येथील वरिष्ठ न्यायाधीशांनी नुकतीच भेट देवून या इमारतीची पाहणी केली. इमारतीच्या कामात असलेल्या छोट्या पण महत्त्वाच्या एकूण 32 त्रुट्या समोर आल्या. या त्रुटींची पूर्तता झाल्यावर इमारत ताब्यात घेण्याबाबतचा निर्णय होणार आहे. न्यायाधीशांच्या निवासासाठी टीव्ही टॉवर मैदानाच्या जागेची पाहणी केली आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीनंतर न्यायाधीश निवासस्थानांचे बांधकाम होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
निवासस्थानांचा प्लॅन
काही किरकोळ त्रुटी सूचवण्यात आल्या होत्या. येत्या आठवडाभरात दुरुस्तीची कामे करून त्या दूर होतील. न्यायाधीशांच्या निवासस्थानांचा प्लॅन तयार आहे. मात्र, अजून जागा ताब्यात मिळालेली नाही. जागा मिळाल्यावर निविदा काढून बांधकाम होईल. यु.एम.कुरेशी, शाखा अभियंता, बांधकाम विभाग
दोन मजल्यांचा प्रस्ताव

अतिरिक्त न्यायालयाच्या कामकाजासाठी सध्या असलेली इमारत भविष्यात अपूर्ण पडू शकते. या इमारतीवर अजून दोन मजले वाढवण्याचे प्रास्तावित आहे. या मंजुरीसाठी बांधकाम विभागाने मागणी केली आहे. सध्या 3700 स्केअर मीटर बांधकाम असून अत्याधुनिक सोयी उपलब्ध आहेत. दोन मजल्याचे काम पूर्ण झाल्यावर लिफ्टदेखील बसवण्यात येईल.

आम्ही मागणीवर ठाम

जोपर्यंत प्रत्यक्ष उद्घाटन नाही, तोपर्यंत इमारतीचा ताबा घेवू नये, अशी सूचना आहे. त्रुटी दूर झाल्यानंतर कामकाज सुरू होण्याचे आश्वासन मिळाले आहे. वकील मंडळी पूर्वीच्या मागणीवर ठाम आहेत. पक्षकार आणि अशिलांना फायदा होण्यासाठी निर्णयाची त्वरित अंमलबजावणी व्हावी. अँड.कैलास लोखंडे, अध्यक्ष, तापी पूर्णा वकील संघ, भुसावळ