आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरच्या चार ताेतया पाेलिसांना शहरात पाठलाग करून पकडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातसध्या तोतया पोलिसांनी उच्छाद मांडला आहे. आठवडाभरात दुसऱ्यांदा तोतया पोलिसांना अटक केली आहे. बुधवारी आकाशवाणी चौकात शहर वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांना विनाक्रमांकाची बोलेरो गाडी दिसल्याने त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते पळून जात असताना पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांच्या जवळून बनावट ओळखपत्र, पोलिसांचे लाठ्या जप्त केले आहेत.
आकाशवाणी चौकात बुधवारी दुपारी ४.३० वाजता एक विनाक्रमांकाची पांढऱ्या रंगाची बाेलेराे गाडी सिग्नलवर थांबली. चालकाने सीटबेल्ट लावलेला नव्हता. त्यामुळे वाहतूक पाेलिस सुनील सोनवणे, सुशील चौधरी यांनी गाडी थांबवण्यास सांगितले. मात्र, बोलेराेचालकाने गाडी थांबवता सिग्नल सुटल्यानंतर सुसाट वेगाने अजिंठा चौफुलीकडे घेऊन गेला. त्या वेळी सोनवणे आणि चौधरी यांनी मोटारसायकलवरून त्यांचा पाठलाग केला. रिलायन्स पेट्रोलपंपाजवळील गतिरोधकावर गाडीचा वेग कमी झाला. त्या वेळी पोलिसांनी त्यांची मोटारसायकल बोलेरोसमोर उभी केली. त्यांच्याकडून कागदपत्रे, लायसन्स मागितले. मात्र, त्यांच्याकडे काहीच नव्हते. त्या वेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी गाडीत नजर टाकली. त्यांना गाडीत पोलिसांचे फायबरचे दोन आणि लाकडी एक दंडा आढळला. त्यांना विचारले असता उडवाउडवीची उत्तरे त्यांनी दिली. शंका आल्याने गाडीची चावी ताब्यात घेऊन त्यांना खाली उतरवले. त्या वेळी सहापैकी दोघे पळून गेले. आजूबाजूच्या नागरिकांना बोलावून पोलिसांनी चौघांना पकडून ठेवून वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांना कळवले. त्यांनी वाहतूक विभागाच्या कार्यालयात घेऊन येण्याचे आदेश दिले.

एलसीबीचे बनावट ओळखपत्र
पोलिस चौघांना घेऊन वाहतूक विभागाच्या कार्यालयात आले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर ते बोलू लागले. संतोष विश्वनाथ कांबळे (वय २३, रा. धामणगाव, जि. बीड), सय्यद अरीफ रफीक (२५, रा. रतडगाव, जि. नगर), गणेश लक्ष्मण जाधव (३३, रा. केडगाव, जि. नगर) आणि आकाश वसंतलाल गांधी (२८, रा. नगर) अशी नावे सांगितली. त्यात संतोषच्या मालकीची बोलेरो गाडी आहे. गणेश हा अहमदनगर येथील महापालिकेत शिपाई आहे. आकाशचे अहमदनगर शहरात मोबाइल दुरुस्तीचे दुकान आहे. अरीफ हा दुधाचा व्यवसाय करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. सुरुवातीला अंत्यविधीसाठी धुळ्याला आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर आकाशने मोबाइल विकत घेण्यासाठी आल्याचे सांगितले. ते अशी उडवाउडवीची उत्तर देत होते. गाडीतून राहूल नितीन घोरपडे, एलसीबी, पुणे या नावाने बनावट ओळखपत्र होते. अॅण्टीकरप्शन ब्युरो, कौन्सिलचे गणेश जाधवचे बनावट ओळखपत्र, एक चाकू, दोन सर्जरी ब्लेड, तीन लाठ्या, मोबाइल, गावठी बनावटीचे पिस्तूलचे मॅगझीन, बीएसएफचे जाकीट आणि एक खाकी रंगाची पँट जप्त केली. त्यांना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.

सप्टेंबरलाही पकडले होते तीन तोतयांना
तोतया पोलिस म्हणून मेहरूण तलाव परिसरात येणाऱ्यांची लूट करणाऱ्या तिघांना देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पकडले होते. त्यात महेश सुभाष बागुल (वय २५, रा. गायत्रीनगर), राहुल भिकन पाटील (वय २९, रा. किसनरावनगर), मोहन प्रकाश पाटील (वय २८, रा. गायत्रीनगर) हे तिघे गेल्या अनेक दिवसांपासून मेहरूण परिसरात येणाऱ्यांना पोलिस असल्याचे सांगून लुटत होते. स्कॉर्पिओतून येऊन त्यांनी अनेकांना लुबाडले होते.

ताेतया नगर येथील मनपा कर्मचारी
तोतया पोलिसांपैकी एक असलेल्या गणेश जाधव हा नगर येथील महापालिकेचा कर्मचारी असल्याचे सांगितले. त्यामुळे सरोदे यांनी नगर महापालिकेतल्या अधिकाऱ्यांशी फोनवरून विचारणा केली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी गणेश हा पालिकेचा कर्मचारी असून तो टपाल देण्यासाठी गेला असल्याने सांगितले.