आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात लवकरच‘4-जी’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महाराष्ट्रातील मेट्रोसिटीनंतर आर्थिक उलाढालीत अग्रेसर असलेल्या जळगाव शहर आणि जिल्ह्यातही ‘4-जी’ इंटरनेट सुविधा वर्षभरात मिळणार आहे. यासाठी जळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कडेने सद्या यासाठी ऑप्टीकल फायबर केबल टाकणे सुरू झाले आहे. जून महिन्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्यानंतर लवकरच ही सेवा ग्राहकांना मिळण्याची चिन्हे आहेत.

वर्षभरात भारतात सर्वात वेगवान इंटरनेट सुविधा देण्यासाठी मोबाइल कंपन्यांची जोरदार चढाओढ सुरू झाली आहे. एखादी सुविधा देतांना राज्यातील महानगरांचा विचार करताना सुवर्ण नगरी म्हणून परिचित असलेल्या जळगाव शहराचे नाव अग्रक्रमावर असते. सद्या ‘4-जी’ नेटवर्कसाठी जळगावातही युद्धपातळीवर काम सुरू आहे.

हरियाणा येथील एच. एस. सी. एल. तसेच आर. जी. आय. ओ. या कंपन्यांच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. जळगाव शहरात या ऑप्टीकल फायबर केबलचे 127 किलोमीटर लांबीची केबल जून महिन्यापूर्वी टाकली जाणार आहे. त्यानंतर मोबाइल टॉवर आणि लॅन्डलाइन कनेक्शनचा पुढील टप्पा राहणार आहे. या कामासाठी पालिकेने परवानगी दिली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यापर्यंत केबल जोडणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

सर्वच भागात केबलचे जाळे
कालिंकामाता, जुना खेडी रोड, या भागात केबल टाकण्याचे काम सुरू आहे. टप्प्याटप्प्याने महाबळ, शास्त्री टॉवर, शाहूनगर, आशाबाबानगर, कोल्हेनगर, शिवकॉलनी, गिरणा टाकी परिसर, एसबीआय कॉलनी, मेहरूण, एमआयडीसी, शारदा कॉलनी, डीएसपी चौक, शिरसोली नाका, पिंप्राळा, महाबळ परिसर या भागांमध्ये केबल (ओएफसी.) टाकण्यात येणार आहे.

मनपाच्या तिजोरीत 3 कोटी
शहरातून डेटा केबल टाकण्याचे काम करताना रस्त्यांची तुटफूट होणार आहे. त्यामुळे या कामासाठी परवानगी देतांना पहिल्या टप्प्यात 70 लाख व नंतर 2 कोटी 44 लाख रुपये जमा करून घेतले आहे. अविनाश गांगोडे, उपायुक्त, मनपा

जूनपूर्वी होणार काम पूर्ण
इंटरनेटच्या 4-जी सुविधेसाठी आवश्यक डेटा केबल टाकण्याचे काम कंपनीने हाती घेतले आहे. सुमारे 20 टक्के काम पूर्ण झाले आहे. जून महिन्यापूर्वी शहरात संपूर्ण 127 किलोमीटर केबल टाकण्याचे उद्दिष्ट आहे. सुमित कोल्हे, प्रतिनिधी, एल.के. बिल्डकॉम