जळगाव; केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित सेवा वस्ती विभागाच्या माध्यमातून सेवारत असलेल्या आरोग्यसेवा केंद्राच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त रविवारी ४१५ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. हरिविठ्ठलनगर येथे आरोग्यसेवा केंद्रात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराच्या सुरुवातीला केशव स्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य स्वर्गीय वसंत शर्मा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात अाली. उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर दिलीप चौबे, मातोश्री वृद्धाश्रमाच्या संचालिका अनिता कांकरिया, नगरसेविका पार्वताबाई भील, केशव स्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील, सेवा वस्ती विभागप्रमुख डॉ.विवेक जोशी यांची तर अध्यक्ष म्हणून जळगाव जनता सहकारी बँकेचे संचालक हरीश यादव उपस्थित होते.
या वेळी दिलीप चौबे यांनी व्यसनमुक्तीचे महत्त्व सांगितले. तसेच नगरसेविका पार्वताबाई भील यांनी मनोगतात केशव स्मृतीचे आभार व्यक्त करत परिसरातील नागरिकांच्या हितासाठी प्रतिष्ठानाला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.विवेक जोशी, सूत्रसंचालन भानुदास येवलेकर, तर आभार संजय कोळी यांनी मानले.
महिलांची हिमाेग्लाेबिन तपासणी
यावेळी अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.प्रताप जाधव, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.संदीप पाटील, डॉ.विशाखा पाटील, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.नयना उभाड पाटील, समुपदेशक डॉ.तृप्ती बढे, जनरल फिजिशियन डॉ.सुदर्शन पाटील, डॉ.जितेंद्र जैन, डॉ.मोहन भावसार, डॉ.विवेक जोशी, डॉ.रवी हिराणी होमियोपॅथीतज्ज्ञ डॉ.कमलेश मराठे यांनी रुग्णांची तपासणी केली.
तसेच महिलांच्या हिमोग्लोबिन तपासणीसाठी तंत्रज्ञ गायत्री कुलकर्णी, जयवंत पाटील नेत्र तपासणीसाठी राजश्री डोल्हारे, समाधान पाटील, मुकेश पाटील आदींनी सहकार्य केले. कृणाल महाजन, आनंद जोशी, तुषार हिवराळे, प्रदीप राजपूत, किशोर गवळी, वैभव पाटील, दीपाली सपकाळे आदींनी सहकार्य केले.
आठ रुग्णांची हाेणार माेतीबिंदू शस्त्रक्रिया
उद्घाटनसत्रानंतर शिबिरास प्रारंभ होऊन ४१५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात १४० महिलांचे हिमोग्लोबिन, अस्थिरोग विभागाच्या माध्यमातून २१५ रुग्णांची, स्त्रीरोग विभागाच्या माध्यमातून ११० महिलांची तपासणी तर १७५ नागरिकांची नेत्र तपासणी करून मोतीबिंदू आढळलेल्या आठ रुग्णांची शस्त्रक्रिया मांगीलालजी बाफना नेत्रपेढीतर्फे मोफत करण्यात येणार आहे. यादरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांकडून समुपदेशन मार्गदर्शन तसेच मोफत औषधोपचार करण्यात आले.