आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ- महसूल विभागातर्फे सध्या 439 शस्त्र परवान्यांच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, बँकेत कमीतकमी 300 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचेच चलन स्वीकारले जात असल्याने शस्त्र परवान्याच्या नूतनीकरणासाठी आवश्यक असलेले 50 रुपयांचे चलन भरण्यात नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तहसील कार्यालयात 50 रुपयांची पावती तयार करण्याची सोय महसूल विभागाने केली आहे. अशाप्रकारची पावतीसुद्धा अर्जासोबत ग्राह्य धरली जाते.
विभागातील भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यात 493 जणांनी बंदूक, पिस्तूल, रिव्हॉल्वर या शस्त्रांची खरेदी केली आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी चारित्र्य पडताळणीची प्रक्रिया पार पाडल्यानंतर शस्त्राचा परवाना दिला जातो. विभागातील 36 शस्त्रधारकांनी त्यांचे परवाने पोलिसांकडे जमा केले आहे. काही जणांवर गुन्हे दाखल झाल्याने, तर काही जणांनी वेळेवर परवान्याचे नूतनीकरण न केल्याने शस्त्रे संबंधित पोलिस ठाण्यात जमा केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
परवान्याला द्यावे स्मार्ट कार्डचे स्वरुप
सर्व शासकीय कामकाज संगणकाच्या आधारे अद्ययावत होत असताना, महसूल विभागाचे कामकाज मात्र आजही बर्याचअंशी कागदपत्रांवर आधारीत आहे. जुन्या काळातील शस्त्र परवान्यांचे फाइलीचे स्वरुप आजही कायम आहे. त्यामुळे शस्त्र परवान्याला स्मार्ट कार्डचे स्वरुप मिळावे,अशी मागणी होत आहे. भुसावळ विभागातील 439 शस्त्रधारकांकडे अद्यापही जुन्याच फाइलीच्या आकाराचे परवाने आहेत. अत्यंत जीर्ण झालेल्या कागदावर नूतनीकरणाचा शिक्का आणि प्रांताधिकार्यांची स्वाक्षरी वर्षातून एकदा केली जाते. जिल्हय़ाचा, राज्याचा किंवा पूर्ण देशाचा परवाना असलेल्यांना रजिस्टरच्या आकाराचा परवाना सोबत बाळगावा लागतो. त्यामुळे स्मार्ट कार्डच्या आकाराचा परवाना मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
निर्णय शासनाचा
शस्त्र परवाने देण्याचे अधिकार जिल्हाधिकार्यांना आहेत. पूर्वीपासूनच चालत आलेले परवाने आताही सुरू आहेत. त्यात आधुनिकता आणण्याबाबतचा निर्णय शासनस्तरावर अपेक्षित आहे. आमच्याकडे नूतनीकरणाचे काम आहे. राहुल मुंडके, प्रांताधिकारी, भुसावळ
पोलिस ठाणेनिहाय शस्त्रांची संख्या
पोलिस ठाण्याचे नाव शस्त्र परवान्यांची संख्या
भुसावळ तालुका 12
फैजपूर 30
बोदवड 08
वरणगाव 30
रावेर 60
बाजारपेठ पोलिस ठाणे 44
मुक्ताईनगर 111
सावदा 42
भुसावळ शहर ठाणे 15
यावल 61
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.