आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

480 पाकिस्तानी सिंधी झाले जळगावकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जिल्ह्यात धार्मिक कार्यक्रमानिमित्त पाकिस्तानातून येणार्‍या नागरिकांचे प्रमाण मोठे आहे. पाकिस्तानातून जळगावात आले आणि जळगावकरच झाले अशा नागरिकांची संख्यादेखील कमी नाही. जळगावात सध्या 480 पाकिस्तानी कुटुंब कायमचे स्थिरावले आहेत. त्यात सर्व सिंधी समाज बांधवांचाच समावेश आहे.

जळगावांतील बहुतांशी सिंधी बांधवांचे नातेवाईक पाकिस्तानातील सिंध प्रांतात राहतात. पाकिस्तानातून त्यांचे नेहमीच जळगावात येणे-जाणे सुरू असते. सिंधी समाजाच्या विविध कार्यक्रमांना ते आवर्जून हजेरी लावतात. त्यामुळे त्यांनी रीतसर पासपोर्टदेखील काढलेला असतो. मात्र नेहमी येणार्‍या जाणार्‍यांपेक्षा कायम वास्तव्यासाठी जळगावात येणार्‍या सिंधी बांधवांची संख्या अधिक वाढली आहे.
व्यवसाय, धार्मिक कामासाठी आले होते शहरात

गेल्या दहा वर्षांत पाकिस्तानातून जळगावात 480 पाकिस्तानी नागरिक कायम वास्तव्यासाठी आले आहेत. व्यवसायानिमित्त किंवा धार्मिक कार्यक्रमांसाठी जळगावात आल्यानंतर हे सर्वजण जळगावकरच झाले.

पाच वर्षांत मिळते भारतीय नागरिकत्व
पाकिस्तानातून भारतात आलेल्या व भारतात स्थिर स्थावर होत असलेल्या नागरिकाला पाच वर्षांतच भारतीय नागरिकत्व मिळते. पाच वर्षे एकाच देशात राहिल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या निर्णयाप्रमाणे त्या नागरिकाला भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात येते. पाच वर्षात जळगावात स्थिरावलेले पाकिस्तानी नागरिक पक्के जळगावकर झाले आहेत.

चार महिन्यात आले 19 जण वास्तव्यास
जानेवारी ते एप्रिल या चार महिन्याच्या कालावधीत जळगावात 19 जण पाकिस्तानातून कायमस्वरूपी वास्तव्यास आले आहेत. या 19 जणांना भारतीय नागरिकत्व प्रदान होणार आहे. त्यांची कायमस्वरूपी वास्तव्याची नोंद रितसर पोलिस अधीक्षक कार्यालयातही करण्यात आलेली आहे.

20 जण पुन्हा पाकिस्तानात रवाना
पाकिस्तानातून जळगावात आपल्या नातेवाइकांच्या भेटीसाठी व धार्मिक कार्यक्रमासाठी परवानगी घेऊन आलेले 20 पाकिस्तानी नागरिक गेल्या चार महिन्यात परत पाकिस्तानात गेले असल्याची नोंद पोलिस अधीक्षक कार्यालयातील पासपोर्ट विभागात करण्यात आलेली आहे.