आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धूमाकूळ - चोरट्यांचे पोलिसांना चॅलेंज ओळीने पाच दुकाने फोडली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात घरफोड्या, चोऱ्या यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.शुक्रवारी शामाप्रसाद उद्यानाजवळील एकाच ओळीतील पाच दुकाने चोरट्यांनी फोडली. मंगळवारी, गुरूवारी आणि शुक्रवारीदेखील चोऱ्या झाल्या. त्यामुळे चोरट्यांनी पोलिसांना चॅलेंजच दिले आहे.

महिनाभरात १५ पेक्षा जास्त घरफोड्या झाल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी दोन चोरट्यांना अटक केली आहे. त्यांनी शहरात घरफोड्या केल्याचे कबुल केले आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी सुरेश कलेक्शनसह दाणाबाजार, फुले मार्केट या परिसरात दुकाने फोडणाऱ्या तिघांची टोळी सक्रिय झाली होती. त्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे; मात्र चोरटे गवसले नाहीत. या टोळीच्या दहशतीमुळे २५ ऑगस्ट रोजी शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांनी रात्रभर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घातली. या तिघांनी चार दिवसांत तीन मोठ्या चोऱ्या केल्यानंतर पोलिसांनी गस्त घातली. हेच जर दैनंदिन कामकाज म्हणून केले असते तर कदाचित त्यानंतरच्या घरफोड्या रोखणे शक्य झाले असते. पोलिसांचा वचक संपल्यामुळे भरवस्तीत चोऱ्या करण्याचे धाडस चोरटे करीत आहेत. भरदिवसा घरफोड्या करण्याचीही हिम्मत चोरट्यांमध्ये बळावली आहे.

काय आहे मोडस ऑपरेंडी ?
सुरेश कलेक्शनमध्ये चोरी करणाऱ्या टोळक्याने शहर पोलिस ठाणे, सुभाष चौकातील पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेली दुकाने फोडली. त्यानंतर शुक्रवारी रात्री डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाच्या बाहेरील पाच दुकाने फोडली. ही दुकाने मुख्य रस्त्यावर तर आहेतच परंतु शहर आणि तालुका पोलिस ठाण्याच्या जवळही आहेत.

"डीबी'ला अल्टिमेटमचाही फरक नाही
पोलिस अधीक्षक डॉ. जे.डी. सुपेकर यांनी शहरातील सर्वच पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला (डीबी) १० दिवसांत चांगले डिटेक्शन करून दाखवण्याचा अल्टिमेटम दिला. त्यानंतर सलग दोन-तीन दिवस घरफोड्या झाल्या. अल्टिमेटम मिळाल्यानंतरही कर्मचारी सजग न झाल्याचे चित्र समोर आले आहे.

छताची पत्रे कापून आत घुसण्याचा प्रयत्न
शुक्रवारी रात्री डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाच्या बाहेर असलेली पाच दुकाने चोरट्यांनी छताचा पत्रा कापून फोडली. सुदैवाने या दुकानांमध्ये पीओपी केलेले असल्यामुळे त्यांना दुकानात प्रवेश करता आला नाही. त्यामुळे मुद्देमाल चोरता आला नाही. रवींद्र सुकलाल वाणी यांचे विजय पान मंदिर, वसंत भाऊलाल भावसार यांचे भाई-भाई जनरल स्टोअर्स, राहुल सूर्यवंशी यांचे सूर्यवंशी मेन्स पार्लर, रवींद्र चंद्रराव मोरे यांचे मोरे टी सेंटर आणि दिनकर शंकर बाविस्कर यांचे अवचित नाश्ता सेंटर ही दुकाने फोडली. दुकानावर असलेला पत्रा कापून चोरट्यांनी दुकानात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्र्याच्या खाली पीओपी केलेले असल्यामुळे आत शिरता आले नाही. केवळ भावसार यांच्या दुकानात पीओपी नव्हते. मात्र, लोखंडी अॅगलमुळे चोरटे आत जाऊ शेकले नाहीत. पण दुकानात वरच्या बाजूला ठेवलेली काही सिगारेटच्या पाकिटांपर्यंत चोरट्यांचा हात पोहोचला. हातात येतील तेवढी पाकिटे घेऊन पोबारा केला. एकाच रांगेतील पाच दुकाने फोडण्याचा पराक्रम चोरट्यांनी केला.

यापुढे खरे आव्हान
सतत सुरू असलेल्या चोऱ्यांमुळे पोलिस यंत्रणा हतबल झाली अाहे. गणेशोत्सवाच्या आधी संपूर्ण यंत्रणा रात्रभर जागली. परंतु चोरटे काही हाती लागले नाहीत. त्यात गणेशोत्सवाचा अतिरिक्त ताण पोलिसांवर पडला. आता निवडणुका जाहिर झाल्यामुळे कामाचा बोझा अधिक वाढणार आहे. त्यामुळे घरफोड्या, भुरट्या चोऱ्या थाबवण्याचे पोलिसांपुढे आव्हानच निर्माण झाले आहे.

शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोऱ्या करणारे रेकॉर्डवरील काही गुन्हेगार संध्याकाळी ताब्यात घेतले आहेत. या पूर्वी काही अल्पवयीन मुलेही वेगवेगळ्या चोऱ्यांमध्ये ताब्यात घेतले होते.