आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 50 Per Cent Of The Primary Schools In Order To Appoint Women

प्राथमिक शाळांमध्ये 50 टक्के महिलांच्या नेमणुकीचा आदेश; राज्यात 55 हजार शाळांमध्ये शिक्षिकांचा अभाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-प्राथमिक शाळांमध्ये 50 टक्के महिला शिक्षकांची नेमणूक करण्याचे आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिले आहेत. मात्र, जिल्हा परिषदेच्या 763 शाळांमध्ये एकही महिला शिक्षक नाही, अशी स्थिती आहे.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने नुकतेच राज्यांच्या शिक्षण संचालकांना प्राथमिक शाळांमध्ये 50 टक्के महिला शिक्षिकांची पदे भरण्याचे आदेश दिले आहे. महिला शिक्षिकांमुळे लहान मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते. ग्रामीण भागात मुलींचे शाळांतील प्रमाण अल्प आहे. शिक्षकांनी त्यांच्या अडचणी समजून घेतल्या नाही तर प्राथमिक वर्गातच मुलींची गळती मोठय़ा प्रमाणात होते. महिला शिक्षिका नेमल्या तर मुलींच्या अडचणी त्या समजावून घेऊ शकतात. राज्यात जिल्हानिहाय प्राथमिक शाळांची संख्या 10 लाख 2 हजार 128 आहे. या शाळांमध्ये दोन लाख 90 हजार 828 महिला शिक्षिका आहेत.

आजही राज्यातील 55 हजार 224 शाळांमध्ये एकही महिला शिक्षिका नाही, ही बाब शिक्षण परिषदेच्या निदर्शनास आली आहे. शाळांमध्ये 50 टक्के महिला शिक्षकांची नेमणूक करण्याचे आदेश शिक्षण विभागांना दिले आहेत.

.तर नव्या शिक्षिका लवकरच भराव्या लागतील

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1854 शाळांपैकी 763 शाळांमध्ये एकही शिक्षिका नाही, अशी धक्कादायक माहिती शिक्षण विभागाने मागविलेल्या अहवालातून समोर आली आहे. प्रथमत: या ठिकाणच्या शाळेत किमान एका शिक्षिकेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला तरी तेवढय़ा महिला शिक्षक जिल्हा परिषदेकडे नाहीत. त्यामुळे हा विषय तूर्त बारगळला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेला नव्याने शिक्षिकांची भरती करावी लागेल तर अतिरिक्त होणार्‍या पुरुष शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्‍न निर्माण होणार आहे.

यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांना अहवाल सादर करण्यात आला आहे. मात्र, त्याबाबत अद्याप कुठलेही कार्यवाहीचे आदेश प्राप्त नाहीत. मुलींच्या अडचणी सोडविण्यासाठी शिक्षिका असल्या पाहिजे पण जिल्ह्याची परिस्थिती पाहता या निर्णयाची अंमलबजावणी करणे जिकिरीचे ठरणार आहे. शिवाजी पाटील, शिक्षणाधिकारी.