आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 700 Citizens In Trouble Fro Crossing The Railway Track

रेल्वे रूळ ओलांडणार्‍या 700 नागरिकांची जीवघेणी कसरत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - आराधना कॉलनी, वेडीमाता मंदिर ते नंदनवन कॉलनी आणि टिंबर मार्केटला जोडणारा तिसरा बोगदा सध्या कागदावरच आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी बोगद्यासाठी निधी मंजूर केला. मात्र, हा पैसा रेल्वे प्रशासनाकडे वर्ग झाला नाही. या मुळे दररोज किमान 700 नागरिकांची रेल्वे रूळ ओलांडण्याची जीवघेणी कसरत कायम आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक चारमधील जुना सतारे, जळगाव रोड, गणेश कॉलनी, आराधना कॉलनी, वेडीमाता मंदिर परिसरातून प्रभाग क्रमांक पाचच्या नंदनवन कॉलनी, चक्रधरनगर, दत्तनगर, टिंबर मार्केट, बद्री प्लॉट आणि आठवडे बाजाराला जोडण्यासाठी रेल्वे रुळांखालून तिसरा बोगदा व्हावा, ही मागणी गेल्या 20 वर्षांपासून प्रलंबित आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, पालकमंत्री संजय सावकारे आणि खासदार हरिभाऊ जावळे यांच्या प्रयत्नांमुळे तिसर्‍या भुयारी बोगद्याला मंजुरी मिळाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत निधीस मंजुरी दिली. मात्र, हा निधी रेल्वे प्रशासनाकडे वर्ग न झाल्याने पुढील प्रक्रिया रखडली आहे.
बोगदा तयार करण्यासाठी दोन वेळा सर्वेक्षण करण्यात आले. लोकप्रतिनिधींनी पाहणी केली. मात्र, तरीही काम सुरू होत नसल्याने स्थनिकांना आश्चर्य आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने हे काम भविष्यातही रेंगाळण्याची शक्यता आहे.
कामाचा तिढा वाढण्याची शक्यता
राज्य शासनाकडून रेल्वे प्रशासनाला बोगदा, ओव्हर ब्रीज तयार करण्यासाठी पहिल्या टप्प्यात निधी मिळतो. यानंतर उर्वरित निधी मिळत नसल्याची ओरड होते. भुसावळातील बोगद्याला पूर्ण निधी मिळेपर्यंत काम सुरू न करण्याची भूमिका रेल्वे प्रशासनाची आहे. या मुळे तिढा वाढण्याची शक्यता आहे.
तीन किलोमीटरचा पडतो फेरा
बोगदा नसल्याने आराधना कॉलनी, वेडीमाता मंदिर आणि रेल्वे रुळांच्या उत्तरेकडील भागातील नागरिकांना दक्षिणेकडील भागात येण्यासाठी तीन किलोमीटरचा फेरा सहन करावा लागतो. या मुळे विद्यार्थी, नोकरदार, गृहिणी, व्यापार्‍यांना रेल्वे रूळ ओलांडताना जीवघेणी कसरत करावी लागते.
175 गाड्यांची वर्दळ
भुसावळातून दररोज जाणार्‍या प्रवासी आणि मालगाड्यांची संख्या 175 च्या आसपास आहे. आउटरजवळच्या या भागात अप साइडच्या रेल्वे गाड्यांचा वेग जास्त असतो. अशावेळी फेरा टाळण्यासाठी रूळ ओलांडणार्‍यांच्या जिवावर बेतू शकते. वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
तिसरा बोगदा गरजेचा
आराधना कॉलनी ते नंदनवन कॉलनीला जोडण्यासाठी तिसरा बोगदा होणे गरजेचे आहे. मंजुरी मिळूनही निधीअभावी काम थांबले आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना भेटणार आहोत. पुरुषोत्तम नारखेडे, माजी नगरसेवक