आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेत ७५ लाखांचे दागिने लुटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मुंबई-हावडा कोलकाता मेलमधून मुंबईतील प्रवाशाचे ७५ लाख रुपयांचे दागिने आणि ५० हजार रुपये रोख असलेल्या बॅगेची चोरी झाल्याची घटना सोमवारी घडली. खंडवा ते जळगाव प्रवासादरम्यान ही चोरी झाली. यात व्हाइट गोल्ड (प्लेटेनियम) चाही समावेश आहे.
मुंबई येथील सुनील लुणावत (दादर वेस्ट) हावडा मेलने शनिवारी खंडव्याकडून मुंबईला जात होते. दुपारी त्यांची गाडी नाशिकपासून पुढे गेल्यावर बॅगची चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. खंडवा ते जळगावदरम्यान रात्री लुणावत कुटुंबीय झोपलेले असतानाच बॅग चोरी झाली. यात प्लेटेनियमचे दागिने, हिरे, पन्ना, दोन रोमेक्स घड्याळे, दोन साेन्याचे ब्रेसलेट, एक नेकलेस, अंगठ्या, हार व ५० हजार रुपये रोख, अशा या सर्व ऐवजाची किंमत ७५ लाख ७१ हजार आहे. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर लुणावत यांनी रेल्वेतील टीटीईकडे तक्रार केली. मात्र, टीटीईने काहीएक ऐकून न घेता उलट त्यांच्याशी हुज्जत घातली. यासंदर्भात भुसावळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक वासुदेव देसले आणि पोलिस निरीक्षक आनंद महाजन पुढील तपास करत आहेत.
जळगाव पोलिसही लागले कामाला
लुणावत आयात-निर्यातीचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडील दागिन्यांची चोरी झाल्यावर रेल्वे पोलिस, जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि शनिपेठ पोलिस ठाण्याच्या पथकांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत जळगावातील रेल्वेत चो-या करणा-या ८ ते १० सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या तपासात प्रचंड गोपनीयता पाळण्यात येत आहे.