आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

80 तासांची संचारबंदी संपतेय पाऊण कोटींची हानी करून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-तांबापुरा भागात बुधवारी रात्री 12 वाजेपासून जारी करण्यात आलेली संचारबंदी रविवारी सकाळी 9 वाजता संपुष्टात येत आहे. दोन दिवसांत 4 तासांची मिळालेली सूट वगळली तर 80 तासांची ही संचारबंदी सुमारे सहा हजारांच्या हातातले 75 लाख रुपये हिरावून गेली आहे.

शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या तांबापुरात काही अंशी मध्यमवर्गीयांचाही रहिवास आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार तांबापुरा आणि फुकटपुरा या भागात सुमारे चार हजार घरे आहेत. या घरांतून रोज सुमारे 5800 नागरिक विविध लहान, मोठे उद्योग, व्यवसाय करतात किंवा रोजगारासाठी रोजंदारीवर इतरत्र कामाला जातात. रिक्षाचालक, एमआयडीसीत जाणारे कामगार, पेंटर, बांधकाम कर्मचारी, मोलकरीण, फळ विक्रेते, मांस विक्रेते, माथाडी कामगार, मच्छीमार, भंगार व्यावसायिक, ट्रक-चारचाकी चालक, दुरुस्ती कारागीर हे प्रमुख उद्योग, व्यवसाय तसेच रोजंदारीचे काम येथील महिला-पुरुष करतात. या 5800 व्यक्ती दिवसाला प्रतिकामगार 300 ते 500 रुपये कमावतात, असे गृहीत धरले तरी रोज सुमारे 25 लाख रुपयांप्रमाणे 3 दिवसांत सुमारे 75 लाखांचा रोजगार बुडाला आहे.

40 जणांना न्यायालयीन कोठडी

दंगलीत 40 आरोपची पोलिस कोठडीची मुदत शनिवारी संपली. न्यायालयाने त्यांना आता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. काही आरोपींना शनिवारी घटनास्थळी नेण्यात आले होते. त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

दंगलीच्या चौकशीसाठी हकीम यांना निवेदन

तांबापुरा दंगलीची सीआयडी चौकशी करण्यात यावी, निरपराध लोकांची सुटका करण्यात यावी, अशा मागणीची निवेदने मुस्लिम सेवा संघातर्फे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांना पाठवण्यात आली. निवेदनावर प्रदेशाध्यक्ष जहांगीर खान, जिल्हाध्यक्ष जमील शेख उस्मान आदींच्या स्वाक्षरी आहेत.

सुमारे दोन हजार मजूर जाऊ शकले नाहीत कामावर

प्रत्येक क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर मजूर उपलब्ध होणारा परिसर म्हणूनही तांबापुराची ओळख आहे. संचारबंदीमुळे तांबापुरातील सुमारे दोन हजार मजूर कामावर जाऊ शकले नाही. परिणामी त्या-त्या उद्योग, व्यवसाय चालकांचीही पंचाईत झाली. पर्यायी मजुरांच्या चणचणीमुळे संचारबंदीचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवरही जाणवला.

पशुपालकांचीही झाली हानी

तांबापुराच्या एका कोपर्‍यावर गवळीवाडा आहे. गवळीवाड्यातील प्रत्येक घरात म्हशी आहेत. संपूर्ण भागात मिळून सुमारे 250 म्हशींचे पालन-पोषण होते. यातूनही मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्माण झाला आहे. एक म्हैस दिवसाला सरासरी 10 लिटर दूध देते. म्हणजेच सुमारे 350 रुपयांचे दूध एका म्हशीपासून मिळते. त्यानुसार 90 हजार रुपये प्रतिदिन याप्रमाणे गवळी बांधवांचे तीन दिवसांत अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.