आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

80 अल्पवयीन दुचाकी चालकांवर कारवाई; पालकांना कानपिचक्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शाळा, कॉलेज, ट्यूशनला जाताना विनापरवाना दुचाकी चालवणाऱ्या ८० शाळकरी मुले, कॉलेजकुमारांविरुद्ध वाहतूक शाखेने दोन दिवस धडक कारवाई केली. शुक्रवारी या मुलांच्या पालकांना वाहतूक शाखेच्या कार्यालयात बोलावून घेण्यात आले. या वेळी खुद्द पोलिस अधीक्षकांनीच किशोरवयीन मुले आणि त्यांच्या पालकांचा ‘क्लास’ घेतला. १८ वर्ष वय पूर्ण झाले नसतानाही मुलांच्या हातात दुचाकी देणाऱ्या पालकांना पोलिस अधीक्षकांनी कानपिचक्या दिल्या. तसेच अल्पवयीन मुले दुचाकी चालवताना अाढळल्यास त्या गाडीची नोंदणी आणि पालकाचा वाहन चालवण्याचा परवानाच रद्द करण्यात येईल, अशी तंबी या वेळी पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी दिली.
 
या वेळी पालकांनीही अापल्या अडचणी कथन केल्या. त्यानंतर १६ वर्षांवरील मुला-मुलींना शिकाऊ वाहन परवाना काढून द्या, तसेच त्यांनी नियमाप्रमाणे वाहन चालवल्यास कारवाई करणार नाही, असे आश्वासन या वेळी पोलिसांकडून देण्यात आले. 
 
शाळा, महाविद्यालये अथवा ट्यूशन क्लासेसला जाण्यासाटी १८ वय पूर्ण नसूनही अनेक शाळकरी मुले, कॉलेजकुमार सर्रास दुचाकी वाहनांचा वापर करतात. अनेक वेळा या मुलांना गाडी चालवताना वेगाचे भान राहात नाही. गणेश कॉलनी, कोर्ट चौक, आकाशवाणी चौक, काव्य रत्नावली चौक, प्रभागत चौक, स्टेडिमय कॉम्प्लेक्स चौक, टॉवर चौकात सायंकाळी गर्दीच्यावेळी अनेक शाळकरी मुले, कॉलेजकुमार भन्नाट वेगात दुचाकी दामटतात.
 
मात्र, बऱ्याच वेळा या मुलांना वेगावर नियंत्रण मिळवणे अवघड जाते. त्यामुळे किरकोळ अपघात होतात.असा अनुभव असल्यामुळेच वाहतूक शाखेतर्फे गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस अल्पवयीन दुचाकी चालकांविरुध्द मोहीम राबवण्यात आली. 
 
या मोहिमेत ८० अल्पवयीन मुलांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. ही वाहने पुन्हा मुलांकडे देता त्यांच्या पालकांनाच शुक्रवारी वाहतूक शाखेच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते. या ठिकाणी पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी पालाकांना सूचना करून प्रत्येक वाहनाला २०० रुपये दंड करून साेडून देण्यात अाले. 

तसेच या वेळी पाेलिस अधीक्षक डाॅ. सुपेकर यांनी पालकांना वाहतूक शाखेत मार्गदर्शन केले. यात त्यांनी मुलांना वाहने देऊ नका, यापुढे अल्पवयीन मुले दुचाकी चालवताना सापडल्यास कडक कारवाई करण्यात येईल. एखादी अप्रिय घटना घडल्यानंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा आधीच काळजी घेणे महत्त्वाचे असते, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर प्रत्येक वाहनाला २०० रुपयांचा दंड करून सोडून देण्यात आले. 

शाळांच्या मदतीने जनजागृती करणार 
-शाळकरी तसेच १८ वर्षांच्या खालील महाविद्यालयीन मुला-मुलींना पालकांनी दुचाकी चालवण्यास देऊ नये. त्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. यात शाळांची मदत घेतली जाणार आहे. - डॉ.जालिंदर सुपेकर, जिल्हा पाेलिस अधीक्षक 
 
५० सीसीपेक्षा कमी वाहनांसाठीच परवाना 
- १६ ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना लर्निंग लायसन्स दिले जाते. पण केवळ ५० सीसी क्षमतेपेक्षा कमी वाहनांसाठीच हे लायसन्स असते. सध्या ५० सीसीपेक्षा कमी क्षमतेचे वाहनच नसल्यामुळे मुले ट्रायलसाठी येत नाहीत. - जयंत पाटील, उपविभागीय परिवहन अधिकारी 
 
किल्ली घेऊन मुले निघून जातात 
काही पालक मुलांना दुचाकी देण्यासाठी नकार देतात. अशा वेळी मुले पालकांची नजर चुकवून दुचाकीच्या चावीचा ताबा मिळवतात. काही वेळानंतर पालकांच्या लक्षात येते; तोपर्यंत या मुलांची रपेट सुरू झालेली असते. आई-वडील दोघे नोकरी, व्यवसायानिमित्ताने घराबाहेर असलेल्या कुटुंबातही अल्पवयीन मुले सर्रासपणे दुचाकीचा ताबा मिळवतात, असे पालकांनी डॉ. सुपेकर यांना सांगितले. यावर कोणताही पर्याय नसल्यामुळे दुचाकी चालवण्याच्या बाबतीत मुलांशी सक्तीने वागावे, असा सल्ला डॉ. सुपेकर यांनी दिली. 
 
शिकाऊ वाहन परवान्याची अट मान्य 
अकरावी बारावीच्या मुलांना क्लासेसला जाण्यासाठी दुचाकीची आवश्यकता असते. त्यामुळे त्यांना सूट द्यावी, अशी मागणी काही पालकांनी पोलिस अधीक्षकांना केली. मात्र, हे कायद्याला धरून नसल्यामुळे अशी सूट देण्यास त्यांनी नकार दिला. मात्र, जर मुलांनी शिकाऊ लायसन्स काढले असेल; आणि नियमात राहून वाहन चालवले, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार नाही, अशी सूट दिली आहे. विना परवाना कोणत्याही प्रकारचे वाहन अल्पवयीनांना चालवताच येणार नाही, असे डॉ. सुपेकर यांनी पालकांना सांगितले. 
 
मुलांचे वाहन परवाने मिळण्यास अडचणी 
१६ ते १८ या वयोगटातील मुलांसाठी वाहन परवाना देण्यात येतो, परंतु मोपेड प्रकारात मोडणाऱ्या गाड्यांसाठीच हा परवाना दिला जातो. या गाड्यांची क्षमता ५० सीसी (क्युबिक कॅपॅसिटी ) अथवा त्यापेक्षा कमी हवी. हा नियम लागू केला त्या वेळी ५० सीसी क्षमतेच्या दुचाकी तयार केल्या जात होत्या परंतु आता एवढ्या कमी क्षमतेच्या गाड्या उपलब्ध नसल्याने पालकांचीही अडचण होते, असे दिसून आले. पालकांच्या या अडचणीला उपविभागीय परिवहन अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला. वाहतूक शाखेच्या कार्यालयात शुक्रवारी पालकांना समजावून सांगताना पोलिस अधीक्षक डॉ. सुपेकर. 
बातम्या आणखी आहेत...