आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हतनूर धरणात ८० टक्के साठा;मागाल तेव्हा आवर्तन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - हतनूर धरणात यंदा उन्हाळ्याचे अडीच महिने लाेटले गेले, तरी तब्बल ८० टक्के जलसाठा शिल्लक आहे. परिणामी, पाणीपुरवठ्यासाठी पालिकेला मागेल तेव्हा आवर्तन मिळणे शक्य झाले आहे. पालिकेने जलशुद्धीकरण केंद्रात अतिरिक्त असलेल्या एका पंपाची दुरुस्ती करून ताे सज्ज ठेवला आहे. म्हणून सध्या तरी टंचाईचे सावट दूर झाले आहे.

भुसावळ शहर नदीकाठावर असल्याने पाण्याची विपुल उपलब्धता आहे. कृत्रिम टंचाईवर मात करण्यासाठी यंदा मात्र, पालिकेने पुरेपूर काळजी घेतली आहे. हतनूर धरणातील जलसाठा आॅगस्टपर्यंत पुरण्याची शक्यता आहे. पालिकेने धरणातील ३० दशलक्ष घनमीटर जलसाठा वार्षिक स्वरुपात आरक्षित केला आहे. धरणात विपुल साठा असल्याने यंदा पालिकेला लागेल तेव्हा आवर्तन मिळेल. जलशुद्धीकरण केंद्रातील राॅ-वाॅटर पंपिंग स्टेशनमध्ये ३०० अश्वशक्तीचा एक पंप पाणी उचलण्यासाठी वापरला जात आहे. अतिरिक्त पंपांचीही दुरुस्ती करण्यात आली आहे.

पालिका आवारातील विहीर संकटमाेचन
शहरातएखाद्या वेळी राेटेशन जर विस्कळीत झाले, तर पालिकेच्या आवारातील विहिरीवरून पाणीपुरवठा केला जाताे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ही विहीर संकटमाेचन म्हणून भूमिका पार पाडत आहे. विस्तारित भागांतील नागरिकही अनेकदा याच विहिरीवरून टँकर भरून टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करतात. वाहनांमधील भांडी भरताना या ठिकाणी हजाराे लिटर पाण्याचा अपव्यय हाेताे. ताे टाळण्यासाठी लवकरच पालिका प्रशासनातर्फे उपाययाेजना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जलशुद्धीकरण केंद्राच्या समाेरील नळावर गेल्या दाेन आठवड्यांपासून दुचाकी, चारचाक वाहने धुण्याचे प्रमाण वाढले आहे. शेजारील अधिकारी उपस्थित असतात. मात्र, त्यांच्याकडून या प्रकाराकडे कानाडाेळा केला जात आहे.
हतनूर धरणात विपुल साठा आहे. शहरात पाणीपुरवठा करणारी यंत्रणा सक्षम आहे. अखंडित वीजपुरवठा झाला, तर यंदा पाणीटंचाईची समस्या भेडसावणार नाही. ए.बी. चाैधरी, मुख्य अभियंता

नियमित पाणीपुरवठा करण्यावर भर दिला आहे. उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेऊन सडा मारणे, वाहन धुण्याचा माेह टाळावा. नळांना ताेट्या बसवल्या तर अपव्यय टाळता येऊ शकताे. अख्तर पिंजारी, नगराध्यक्ष

सत्ताधार्‍यांच्या प्रभागात मुबलक विराेधी नगरसेवकांच्या प्रभागात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाताे. हा प्रकार वेळीच थांबला पाहिजे. पाणीवाटपात राजकारण हाेऊ नये. निर्मल काेठारी, नगरसेवक

उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नसली, तरी बद्री प्लाॅट, दत्तनगर, वांजाेळा राेड भागात जलवाहिनीला गळती लागल्याने अशुद्ध पाणीपुरवठा हाेत आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकावी.

वीज वितरण कंपनीकडून पाणीपुरवठा यंत्रणेवर एक्स्प्रेस फीडरची जाेडणी केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून दरराेज दुपारी वीज गुल हाेते. काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाताे.

पाणी शुद्धीकरणासाठी अ‍ॅलम, क्लाेरिन गॅसचा वापर वाढवण्यात आला आहे. तसेच जलवाहिन्यांना लागलेली गळती दुरुस्तीसाठी पालिकेने लक्ष केंद्रित केल्याने अपव्यय टाळणे शक्य हाेणार आहे.
बातम्या आणखी आहेत...