आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 83 Second Thrills On Petrol Pamp,latest News, Divya Marathi,

पेट्रोल पंपावर 83 सेकंदांचा थरार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शिरसोली नाक्यावरील पेट्रोल पंपावर मंगळवारी सकाळी 11 वाजता डिझेल भरण्यासाठी गेलेल्या स्कूल व्हॅनमध्ये (टाटा मॅजिक) शॉर्ट सर्किट झाल्याने तिने अचानक पेट घेतला. चालकाला ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने लागलीच विद्यार्थ्यांना खाली उतरविले. तर पंपावर आलेल्या एका नागरिकाने फायर एक्स्टिंग्युशरच्या मदतीने काही सेकंदातच आग विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. पंपावरील हा 83 सेकंदांचा थरार अनेकांच्या जीवाचा थरकाप उडविणारा होता.
विवेकानंद प्रतिष्ठानच्या काशिनाथ पलोड स्कूल व्हॅन (एमएच 19 वाय 5224) चालक अनिल भावसार हे एक मदतनीस शिक्षिका आणि 8 विद्यार्थी घेऊन शाळेत जात होते. सकाळी 11 वाजता चालकाने शिरसोली नाक्यावरील कादरी ट्रान्सपोर्टच्या पंपावर गाडी वळवली. यावेळी अचानक गाडीच्या रेडीएटरजवळच्या वायरने पेट घेतल्याने धूर निघू लागला. हे चालकाच्या लक्षात आल्याने त्याने तत्काळ गाडी थांबवत शेजारी बसलेल्या तेजस्वी भालेराव आणि मागे बसलेल्या विद्यार्थ्यांना खाली उतरविले तर पेट्रोल पंपावर आलेल्या गोपाळ क्षीरसागर यांनी फायर एक्स्टिंग्युशर काढून काही सेकंदातच आग आटोक्यात आणली. या घटनेत तेजस्वी भालेराव यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. स्कूल व्हॅन ज्याठिकाणी उभी होती तेथून 10 फूट अंतरावर गॅस सिलिंडर वाहून नेणारी रिक्षा होती जर आग लागली असती तर मोठा अनर्थ घडला असता.
वाहनांवर पूर्णपणे असते संस्थेचेच नियंत्रण
विवेकानंद प्रतिष्ठानच्या शाळांमध्ये वापरल्या जाणार्‍या स्कूल व्हॅनवर संस्थेचे नियंत्रण आहे. घटना घडल्यानंतर संस्थेच्या स्कूल बस विभागाचे प्रमुख मिलिंद पुराणिक यांनी गाडी संस्थेच्या ताब्यात घेऊन पुन्हा दुरुस्तीला पाठविली आहे. दरम्यान व्हॅनला आग लागली नसून गरम झालेल्या रेडिएटरवर पाणी पडल्यामुळे धूर निघाला होता. असे पुराणिक यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.