आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारागृहाच्या 9 हेक्टर जागेत परस्पर प्लाॅट पाडून विक्री; चहूबाजूंनी कब्जा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - ब्रिटिशकाळापासून कारागृहाच्या मालकीची असलेली तब्बल नऊ हेक्टर जागा अतिक्रमितांनी वेढली अाहे. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि निष्काळजीपणामुळेच या जागेवर दलालांनी चक्क छोटेखानी प्लॉट पाडून परस्पर सरकारी जागा विक्रीचा प्रताप सुरू केला आहे. हळूहळू विस्तारित होत असलेल्या अतिक्रमणामुळे निम्म्याहून अधिक जागा दलाल आणि अतिक्रमितांनी गिळंकृत केली. तर दुसरीकडे या जागेची फाइल अजूनही शासकीय कार्यालयाच्या लाल फितीमध्ये अडकली आहे.
 
श्री एकवीरादेवी मंदिर देवपूर अमरधामपासून काही अंतरावर जिल्हा कारागृहाच्या मालकीची जागा आहे. अगदी ब्रिटिश काळापासून ही जागा कारागृहाच्या मालकीची आहे. सर्व्हे क्रमांक ३२ ११३ मध्ये ही जागा आहे. त्यापैकी सर्व्हे क्र. ३२मध्ये तीन हेक्टर १९ आर एवढी तर सर्व्हे क्र.११३मध्ये सहा हेक्टर १४ आर एवढी जागा आहे; परंतु ही जागा आता केवळ शासकीय दप्तर कागदावर शिल्लक आहे. ओसाड पडलेल्या या जागेची कारागृह आणि प्रशासन यापैकी कोणीही दखल अथवा काळजी घेतली नाही. परिणामी कथित दलालांचे फावले. त्यांनी शासकीय जागा असताना या ठिकाणी मर्जीनुसार अक्षरश: प्लॉट पाडले. शिवाय मोजणी-आखणी करून हस्ते-परहस्ते त्यांची विक्रीही केली. ५० ते ७० हजारांपर्यंत त्यांची किंमत अाकारली. अशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या काही श्रमिकांनी या जागा घेतल्या.

तर काहींनी त्यांना जुमानता स्वत:च या जागेवर हक्क सांगितला. याच ठिकाणी दफनभूमीही आहे. दफनभूमीची जागा सोडली तर इतरत्र अतिक्रमितांनी आपली घरे बांधली आहेत. प्रशासनातील कोणी पाऊलच उचलत नाही हे पाहून कथित काही दलालांनी तर चक्क दफनभूमीपर्यंत प्लॉट पाडले आहेत. या जागेवर फोफावत असलेले अतिक्रमण काही नवीन नाही. यापूर्वी सन २०१२मध्ये याच जागेवर रात्रीतून अनेकांनी तंबू-राहुट्या लावून अतिक्रमण केले होते. सुमारे १०० ते १५० जणांंकडून झालेला अतिक्रमणाचा प्रयत्न तत्कालीन कारागृहाचे अधिकारी प्रशासन अधिकारी, पोलिस प्रशासनाने हाणून पाडला होता. या घटनेला आता उणेपुरा पाच वर्षांचा अवधी उलटला आहे; परंतु अजूनही प्रशासनाने या जागेकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे गेल्या काही काळात फूट-मीटर करीत हजारो स्क्वेअरफूटमध्ये जागा अतिक्रमित झाली. काहींनी तर या ठिकाणी चक्क पक्की घरे बांधली आहेत. एवढेच नव्हे तर आता कुठे अजगरी झोपेतून जागे झालेले प्रशासन कारागृहाचे अधिकारी या ठिकाणी फलक लावण्यासाठी गेले असता त्यांना हरकतही घेण्यात आली. त्यांची पाठ वळताच शासकीय फलकही फाडल्याचे अाढळून अाले अाहे.
 
लवकर म्हणत उलटले पाच वर्षे
सन२०१२मधील अतिक्रमितांचे प्रयत्न हाणून पाडले. तत्कालीन कारागृह अधीक्षक बळवंत काळे यांनी वरिष्ठस्तरावर पत्रव्यवहारही केला. अंदाजपत्रक काढून जागेची मोजणी केली. कुंपण करण्याचा प्रशासनाचा विचार होता; परंतु तातडीने केलेल्या या पत्रव्यवहाराला पाच वर्षे उलटली; अजून मोजणी झाली नाही. तर दुसरीकडे कुंपण लावण्यासाठी अतिक्रमितांनी जागाच ठेवली नाही. त्यामुळे अतिक्रमण काढताना पेचप्रसंगालाही सामोरे जावे लागू शकते.
 
दलालांचा शोध नाहीच
कारागृहाच्याशासकीय जागेवर प्लॉट पाडून त्यांची सौदाविक्री करणारे कथित दलाल विटाभट्टी परिसरात राहतात. या दलालांनी केवळ या जागेचीच नव्हे तर विटाभट्टी जवळून जाणाऱ्या सुशी नाला परिसरातील मनपा जागेचीही हस्ते-परहस्ते विक्री केली आहे. शिवाय अनेकांना गंडाही घातला आहे; परंतु या दलालांवर मात्र ठोस कारवाई झाली नाही. कारागृह, मनपा सोबत पोलिस प्रशासनाची ही हतबलता म्हणावी लागेल, असेच सध्याचे चित्र अाहे.
 
लाल फितीत फाइल
सन२०१० पासून कारागृह जागेच्या हक्कासाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार पाठपुरावा करत आहे. यातून महापालिका आणि सिटी सर्व्हे विभाग यांच्याशीही पत्रव्यवहार झाला. जानेवारी २०१०च्या पहिल्या आठवड्यापासून बैठकही झाली आहे. कारागृहाच्या या पत्रव्यवहाराला तत्कालीन मनपा अधिकाऱ्यांनी जागेवर मनपाच्या परवानगीने बांधकामाला परवानगी दिलेली नाही, असे तांत्रिक उत्तर उलटटपाली दिले आहे. त्यामुळे या विषयी आता काय निर्णय होतो याकडे लक्ष लागून आहे.
कारागृहाच्या याच नदीकिनारी अाेसाड असलेल्या जागेवर प्लाॅट पाडण्याचा घाट घातला जात अाहे.
बातम्या आणखी आहेत...