आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्वदीनंतरही डगमगली नाही ‘त्यांची’ लेखणी!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सेवानिवृत्तीनंतर आराम करावा असे गणित ठरलेले असताना काही लोक आदर्श ठरावे असे कार्य करीत असतात. मंगला गोखले या आजीबाई त्यापैकीच एक. त्यांचा आदर्श घेणे म्हणजे आपल्या आयुष्याचे सोने करण्यासारखेच आहे. वयाच्या 93 व्या वर्षी गोखले आजी भिंगाचा वापर करून लेखन करीत आहेत. आतापर्यंत 21 पुस्तकांचे प्रकाशन झाल्यानंतरही त्यांचे सातत्याने लेखन सुरू आहे. डोळे साथ देत नसल्यामुळे डाव्या हातात भलामोठा भिंग धरून उजव्या हाताने त्यांची लेखणी सुरू आहे.

1920 मध्ये पुण्यात जन्मलेल्या मंगला गोखले यांचे शिक्षण एमए बीटी पर्यंत शिक्षण झाले. महाविद्यालयात असताना वसंत बापट, शांता शेळके, सरोजिनी बाबर यांचा सहवास त्यांना लाभला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर बडोदा येथील जयश्री मॉडेल स्कूलमध्ये अध्यापिका म्हणून त्यांनी नोकरी केली.

वयाच्या 77 व्या वर्षी त्यांचा मोरपिसारा हा बालकविता संग्रह प्रसिद्ध झाला. लहान मुलांसाठी त्यांनी लेखन सुरू केले. सप्तरंगी, संस्कारसुमने ही पुस्तके मुलांसाठी लिहिली. तसेच विवाहप्रसंगी गायीली जाणारी गाणी, उखाने, माझी बाहुली, मंगल सोहळे, पर्यावरण गीते, सांस्कृतिक संमेलनासाठी कविता व नाटिका, थोर नेत्यांवरील गीते, आपले सण, मुलांसाठी संस्कार आणि छान-छान शाळा ही पुस्तके त्यांनी लिहिली. आकाशवाणीवर 100 पेक्षा जास्त कार्यक्रम झाले. त्यांची ‘चैत्रपाडवा’ ही कविता आठवीच्या मराठीच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. राज्यातील अनेक वृत्तपत्रांमध्येही त्यांनी लेखन केले आहे. आत्तापर्यंत प्रकाशित झालेले एकही पुस्तक त्यांनी विक्री न करता शाळांमधील विद्यार्थी आणि भजनी मंडळांना मोफत दिले आहे. नुकतेच त्यांनी ‘भक्तिसुगंध’ या भक्तीरचनांच्या पुस्तकाचे लेखन केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी सायंकाळी 6 वाजता व.वा. वाचनालयाच्या नवीन सभागृहात होते आहे.

मुलांसाठी लेखन सुरूच - सध्या संस्कार, किशोर, केसरी आणि रानवारा या मासिकांमध्ये लेखन करीत आहेत. मुलांवर संस्कार करण्यासाठी पालक, शिक्षकांना मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने त्यांचे लेखन आहे. पुणे, मुंबई, नागपूर या शहरामध्ये टपालाने लेख पाठवून पाठपुरावा करतात. आजीबार्इंचा हा लेखनप्रवास कुणाच्याही मदतीशिवाय सुरू आहे. या लेखनप्रवासात आता लेखणीच नव्हे, तर भिंगही सोबतीला आला आहे. यामुळे त्यांचे लेखनकार्य विनाअडथळा सुरू आहे.