आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा निवडणुकीत ४८ इमारतींमधील १४६ मतदान केंद्र संवेदनशील, उपद्रवी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ४६९ मतदान केंद्रांची अाखणी करण्यात अाली अाहे. त्यात ४८ इमारतींमधील तब्बल १४६ मतदान केंद्र संवेदनशील तथा उपद्रवी असल्याचा अहवाल पाेलिस प्रशासनाने दिला अाहे. उपद्रवी उमेदवार, राजकीय शत्रुत्व त्यात मतदान केंद्रांना संरक्षण भिंती नसल्याचे प्रमुख कारण देण्यात अाले अाहे. या केंद्रांच्या बाहेर व्हिडिअाे चित्रीकरण करून उपद्रवींवर लक्ष केंद्रित केले जाणार अाहे. 


मनपा निवडणुकीसाठी १ अाॅगस्ट राेजी मतदान हाेणार अाहे. यादृष्टीने पालिका व पाेलिस प्रशासनाने संपूर्ण तयारी जाेमाने सुरू केली अाहे. एेन मतदानाच्या दिवशी राजकीय कारणावरून वातावरण अशांत करण्याचे प्रकार हाेत असतात. त्यावर वेळीच नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने पाेलिस प्रशासनाने गेल्या काही निवडणुकींच्या अनुभवातून त्रासदायक मतदान केंद्रांची यादी तयार केली अाहे. यात ४६९ पैकी १४६ बूथवर विशेष लक्ष केंद्रित करावे लागणार अाहे. उपद्रवी मतदान केंद्रांवर शिक्कामाेर्तब करताना पाेलिस प्रशासनाने त्या परिसरातील लाेकवस्ती, उमेदवारांची स्थिती, गुन्हेगारी पार्श्वभूमी अादींचा संदर्भ देत काळजी घेतली जाणार अाहे. 


जादा बंदाेबस्त राहणार
उपद्रवी मतदान केंद्रांच्या १०० मीटर अंतरात सहायक पाेलिस निरीक्षक व पाेलिस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी व अतिरिक्त पाेलिस कर्मचारी तैनात असतील. तसेच व्हिडिअाे कॅमेऱ्यांची नजर राहणार अाहे. पेट्राेलिंगसाठी कर्मचारी नियुक्त केले जातील. अशा केंद्राच्या १०० मीटरच्या अंतरातील सर्व अास्थापना बंद ठेवण्यात येणार अाहेत, असे पाेलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी सांगितले. 


प्रभाग क्रमांक दाेनवर राहणार करडी नजर 
उपद्रवी मतदार केंद्रांची संख्या प्रभाग क्रमांक दाेन मध्ये सर्वाधिक आहे. येथे २० केंद्र उपद्रवी अाहेत. त्यापाठाेपाठ प्रभाग क्रमांक १ मध्ये १७, प्रभाग क्रमांक १८ मध्ये १६, प्रभाग क्रमांक १५ मध्ये १५, तसेच प्रभाग क्रमांक ४ व १० मध्ये प्रत्येकी १३ केंद्र संवेदनशील अाहेत. त्यामुळे शिवाजीनगरातील राजमालतीनगर, खुबचंद विद्यालय, मनपा शाळा क्रमांक १५, शाळा क्रमांक १, नजीम मलिक प्राथमिक शाळा, मेहरूण मधील पालिकेची उर्दू शाळा क्रमांक ३६/५६, अयाेध्यानगरातील सिद्धी विनायक विद्यालय, संत कंवरराम हिंदी पाठ शाळा, श्रीराम कन्या प्राथमिक विद्यालय, रामपेठेतील शाळा क्रमांक २२, वाल्मीकनगरातील बगिचातील व्यायाम शाळा, मन्यारवाड्यामधील पालिकेची उर्दू शाळा क्रमांक ४९ अादी मतदान केंद्रांवर पाेलिसांना लक्ष केंद्रित करावे लागणार अाहे. 


जातीयदृष्ट्या अतिसंवेदनशील भाग 
उपद्रवी मतदान केंद्रांच्या यादीत १४६ केंद्रांच्या परिसरात मिश्र गरीब प्रवर्ग अाहे. या भागांत तुल्यबळ लढती रंगणार अाहेत. बऱ्याच मतदान केंद्रांना संरक्षण भिंत नाही. काही भाग हा जातीयदृष्ट्या अतिसंवेदनशील असून गुन्हेगारांचे वास्तव्य असल्याचे पाेलिसांचे म्हणणे अाहे. काही ठिकाणी १०० मीटरच्या अात संमिश्र लाेकवस्ती अाहेे. त्याचाही त्रास उद‌्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिंदू-मुस्लिम मिश्र गरीब प्रवर्गाचा रहिवास, २०१७ मध्ये गणेशाेत्सवादरम्यान गुन्हा दाखल अाहे. कांचननगर, वाल्मीकनगर परिसरात काेळी समाजाची वस्ती अाहे. सन २००८ व २०१३ मध्ये निवडणूक काळात गुन्हे दाखल असलेल्यांवरही नजर ठेवली जात अाहे. 


मतदानासाठी गुरुवारपासून प्रशिक्षण 
मतदानासाठी कर्मचारी व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात अाली अाहे. या कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेबाबतचे प्रशिक्षण १९ ते २४ जुलै दरम्यान देण्यात येणार अाहे. हे प्रशिक्षण सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन नाट्यगृह येथे हाेणार अाहे. तसेच तिसरे प्रशिक्षण ३१ जुलै राेजी एमआयडीसीतील ई-८ गोडाऊन येथे हाेणार अाहे. या प्रशिक्षणाला काेणत्याही कर्मचारी विना परवानगी गैरहजर राहिल्यास किंवा निवडणूक कामात टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र महापालिका अधिनियम व निवडणूक नियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे अादेश मुख्य निवडणूक अधिकारी त‌था महापालिका अायुक्त चंद्रकांत डांगे यांनी काढले अाहे. 


तीन प्रभागांत एकही केंद्र नाही 
शहरातील मुक्ताईनगर, भाेईटेनगरपासून खाेटेनगरपर्यंतचा परिसर, स्वातंत्र्य चाैकापासून पाेलिस लाइनचा परिसर, तसेच मू. जे. महाविद्यालयाच्या परिसरापासून महाबळ परिसर या प्रभाग क्रमांक सहा, अाठ व १२ मध्ये एकही उपद्रवी व संवेदनशील मतदान केंद्र नसल्याचा अहवाल पाेलिस प्रशासनातर्फे देण्यात अाला अाहे. 

बातम्या आणखी आहेत...