आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेरात 13 लाखांची बनावट दारू पकडली; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर, जळगाव- चोपडा येथून पनवेल (मुंबई) येथे बनावट दारू घेऊन जाणारा एक ट्रक राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने अमळनेरातील रेल्वे गेटजवळ गुरुवारी दुपारी पकडला. या ट्रकमध्ये १३ लाख २४ हजार रुपयांची बनावट दारू सापडली. ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे. 


चोपड्याकडून एका ट्रकमध्ये बनावट दारूची वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार जळगावातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अमळनेर-चोपडा रेल्वे गेटजवळ एमएच ०४ एचडी ५८११ हा ट्रक अडवला. या ट्रकमध्ये रिकाम्या कॅरेटचा आडोसा घेऊन बॉम्बे स्पेशल व्हिस्की व रॉयल क्राऊन व्हिस्कीच्या बाटल्या असलेले ३१० खोके आढळून आले. १३ लाख २४ हजार रुपये किमतीची दारू व ५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ट्रकचालक सलीम अहमद अन्सारी (वय ३१, रा.सायन, मुंबई) याला अटक करण्यात आली आहे. बोअरअजंटी (ता.चोपडा) येथून हा ट्रक भरण्यात आल्याची माहिती पथकाला मिळाली आहे. कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस.के.कोल्हे, अमळनेर येथील दुय्यम निरीक्षक जी.जी.अहिरराव, जवान डी.बी.पाटील, नंदू नन्नवरे, नितीन पाटील, आर.डी.जंजाळे, वाहनचालक जी.डी.अहिरे, अमळनेर पोलिस ठाण्याचे ज्ञानेश्वर सपकाळे, किशोर पाटील, प्रमोद बागडे, सुनील पाटील आदींनी ही कारवाई केली. दरम्यान, पथकाने ट्रक पकडल्यानंतर सलीमने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्या पायांना काटे टोचून तो जखमी झाला होता. 


चालक बदली करून वाहतूक
ट्रकचालक सलीम हा बुधवारी रात्रीच रिकामा ट्रक घेऊन चाेपड्यात आला. मध्यस्थांनी ताे ट्रक ताब्यात घेऊन सलीमला रात्रभर फुटपाथवर साेडले. त्यानंतर गुरुवारी सकाळी १० वाजता हा दारूच्या खोक्यांनी भरलेला ट्रक त्याच्या ताब्यात दिला. हा ट्रक घेऊन त्याला धुळ्यापर्यंत जायचे होते. तेथून दुसरा चालक पुढचा प्रवास करणार होता. या कामासाठी एक हजार रुपये मिळणार होते, अशी माहिती सलीमने दिली. 


जळगावात पकडली हाेती १८ लाखांची दारू
एलसीबीच्या पथकाने १४ रोजी जळगावातील गुजराल पेट्रोल पंपाजवळ १८ लाख २० हजार रुपयांची बनावट दारू घेऊन जाणार ट्रक पकडला होता. त्यानंतर चारच दिवसांनी पुन्हा बनावट दारूचा ट्रक पकडला आहे. 

बातम्या आणखी आहेत...