आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमध्ये नागदेवी पाझर तलावाच्या दुरूस्तीसाठी आंदोलन; बेमुदत उपोषणाचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल (जळगाव)- ‘नागदेवी पाझर तलावाची दुरूस्ती झालीच पाहिजे’ अशा घोषणांनी सोमवारी यावल शहर दणाणले. जलसंपदामंत्री गिरिश महाजन यांनी आपल्याच तालुक्यात जलयुक्तची कामे केली व यावल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असा आरोप करीत हजारो शेतकऱ्यांनी 2006 मध्ये अतीवृष्टीत फुटलेल्या नागादेवी पाझर तलावाच्या दुरूस्ती करीता सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. 20 मार्चपर्यंत काम सुरू झाले नाही तर 22 मार्च पासुन तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

 


या माेर्चात परिसरातील 11 ग्रामपंचायतीतील नागरिक, शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीपासुन सकाळी साडेअकरा वाजता मोर्चास सुरवात झाली. अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावरून घोषणाबाजी करीत मोर्चेकरी तहसिल कार्यालयावर धडकले. सातपुड्याच्या पायथ्याशी दहिगाव – सावखेडासिम गावाजवळ नागदेवी हा पाझर तलाव असुन शासनाकडे अनेक वेळा निवेदने देवून शासनाच्या वतीने गेल्या 12 वर्षात अनेक वेळा केवळ आश्वासनच दिले मात्र, प्रत्यक्षात काम झाले नाही व आता अल्प पावसामुळे परिसरातील विहीरींचे पाणी खालावले असल्याने आणि जलसिंचनाकडे शासनही दुुर्लक्ष करीत असल्याने परिसरातील नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. आता 20 मार्चपर्यंत काम सुरू झाले नाही तर 22 मार्चपासुन तहसिल कार्यालयासमोर 11 गावातील शेतकरी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या वेळी नायब तहसिलदार डॉ. योगीता ढोले व रावेर लघुसिंचन उपविभागाचे उपअभियंता रामेश्वर जाधव, पोलिस निरिक्षक डी. के. परदेशी, दहिगावचे उपसरपंच देविदास पाटील, मसाकाचे चेअरमन शरद महाजन, पंचायत समितीचे गटनेता शेखर पाटील, यावलचे उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले, नगरसेवक अतुुल पाटील, बाजार समितीचे संचालक राकेश फेगडे, वसंत पाटील, राष्ट्रवादीचे विजय पाटील, अनिल साठे, बारसु नेहेते, दिनकर पाटील, विनोद पाटील, भाजपचे उजैन्नसिंग राजपूत, नावरेचे सरपंच समाधान पाटील उपस्थित होते.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...