आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील ५४२ शिक्षकांना बदल्यांचे सुधारित आदेश; ऑनलाइन प्रक्रियेत पुन्हा घोळ झाल्याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जि.प. प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांमधील घोळानंतर शिक्षकांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत एनआयसीने जिल्ह्यातील ५४२ शिक्षकांच्या हातात मंगळवारी पुन्हा सुधारित आदेश पडले आहेत. मात्र, या सुधारित आदेशानेही या प्रक्रियेत अनेक घोळ वाढवले असून बदली प्रक्रियेत विस्थापित झालेले शिक्षक पुन्हा संभ्रमात पडले आहे. याविरोधात न्यायालयात लढा कायम ठेवण्याचा इशाराही शिक्षक संघटनांनी दिला आहे. 


बदल्यानंतर झालेल्या शिक्षकांचा विरोध लक्षात घेता एनआयसी (पुणे) कार्यालयाने विस्थापित व गैरसोयीच्या ठरलेल्या ५४२ शिक्षकांना पुन्हा सुधारित आदेश दिले आहेत. यात ज्या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत, त्यांची बदली रद्द करून पुन्हा अर्ज भरण्यास सांगण्यात आले आहे. यासह काहींना नवीन ऑर्डर देण्यात आल्या आहेत. यामुळे शिक्षकांना या शाळेतून त्या शाळेत असा खो-खोचा खेळ खेळवला जात आहे. या सुधारित आदेशात फार सुधारणा न करता विस्थापितांना न्याय देण्यात आलेला नसल्याच्या तक्रारी शिक्षकांमधून केल्या जात आहेत. कम्पल्सरी व्हॅक्नसीच्या ठिकाणीही शिक्षक दिले आहेत. काही शाळांमध्ये सिनिअर सोडून ज्युनिअर शिक्षकास विस्थापितांमध्ये टाकण्याचा प्रकार या सुधारित आदेशात घडला आहे. 


तसेच काही सोयीच्या ठिकाणी गेलेल्या शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांना पुन्हा अर्ज भरण्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे बदल्या तुम्हीच करायच्या व त्या तुम्हीच रद्द करायच्या, यासह तुम्हीच म्हणायचे की पुन्हा फाॅर्म भरा, असा अजब प्रकार शिक्षण विभागाकडून सुरू असून सुधारित आदेश दिल्यामुळे ५४२ लोकांच्या चुकीच्या पद्धतीने बदल्या झाल्याचे आता सिद्ध झाले आहे, असेही शिक्षकांचे म्हणणे आहे. दरम्यान, सुधारित आदेशातही गैरसोय झालेल्या शिक्षकांना अद्याप दोन राउंडमध्ये अर्ज करता येणार आहे. बदल्यांचा हा खो-खोचा खेळ सुरू असल्याने उन्हाळी सुटी या बदल्यात वाया गेल्याची तक्रारही शिक्षकांनी केल्या आहेत. 


बदल्यांची प्रक्रिया पारदर्शी 
बदल्यांची प्रक्रिया पारदर्शी पद्धतीनेच झाली आहे. मात्र, शिक्षकांच्या तक्रारीनुसार पुन्हा आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाभरातून आलेल्या शिक्षकांचे प्रस्ताव एनआयसीकडे पाठवले होते. अजूनही काही तक्रारी असतील तर दोन राऊंड शिल्लक आहेत; त्यांना त्याद्वारे न्याय मिळू शकणार आहे. ही सर्व प्रक्रिया मानवी हस्तक्षेपाविना आहे. 
- बी.जे.पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी 


पुन्हा आंदोलन उभारणार 
या आधी झालेल्या बदल्यानंतर शिक्षक संबंधित शाळांवर हजर झाले आहेत. मात्र, त्यांना पुन्हा सुधारित आदेश पाठवले. काही ठिकाणी पती-पत्नी हजर होऊन गेले आहेत. काही ठिकाणी हजर झालेल्यांना विस्थापित दाखविले गेले. बदली झालेल्यांना पुन्हा आदेश मिळाल्याने संभ्रम वाढला आहे. सुधारित आदेशाने बदल्यांतील हा घोळ अधिक वाढला आहे. या विरोधात शिक्षक संघटना पुन्हा आंदोलन उभारेल. 
- विजय बागुल, जिल्हाध्यक्ष, पदवीधर शिक्षक संघटना 


सुधारित आदेशाच्या नावाखाली नौटंकी 
शिक्षकांनी केलेल्या आंदोलनानंतर काहीच बदल न करता धूळफेक केली आहे. केवळ दखल घेतल्याची नौटंकी केली आहे. यात एकही सकारात्मक बदल झालेला नाही. यामुळे हिंमत करून सुद्धा यास सुधारित म्हणता येत नाही. यामुळे आम्ही न्यायालयात खेचून एनआयसीची दमछाक करू. पारदर्शक या गोंडस नावाखाली बदल्या केल्या. मात्र, तसे दिसत नाही. या विरोधात न्यायालयात आमचे म्हणणे ऐकावेच लागेल. 
- रवींद्र सोनवणे, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय शिक्षक संघ 

बातम्या आणखी आहेत...