आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापुरात बिबट्याची शिकार? काळंबा परिसरात उसाच्या शेतात मृतावस्थेत आढळला बिबट्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर-शहराजवळ असलेल्या काळंबा गावातील उसाच्‍या शेतात मृत बिबट्या आढळून आला. विनोद विजय गामीत (४५) यांच्‍या शेतात हा बिबट्या आढळून आला. विषबाधा झाल्‍याने बिबट्याचा मृत्‍यू झाल्‍याचा दावा वनविभागाकडून करण्‍यात आला आहे. मृत बिबट्याची नखे गायब असून त्‍याची शिकर झाल्‍याची शंका व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे. दरम्‍यान या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. 


  या बाबत प्राप्त माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, शहर परिसरात काळंबा गांव शिवारातील विनोद विजय गामीत यांच्या शेतात ऊसतोडणी सुरु असतांना मजूरांना मृतावस्थेत बिबट्या आढळून आला. बिबट्या अनेक दिवसापासून मेलेला असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. बिबट्याचे शव कुजलेले दिसून आले. सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ऊस तोडणीला सुरूवात केली. त्यानंतर ऊस कामगारांना तोडणी दरम्यान दुपारी बारा-एक वाजेच्या सुमारास मेलेल्या प्राण्याचा वास येत असल्याने त्यांचा शोध घेतला असता बिबट्या मेलेला असल्याचा प्रकार उघडकीस आला. महिला ऊस कामगार भीतीने इकडे तिकडे धावू लागले होते. त्यानंतर  विजय गावित यांनी वन विभागाला संपर्क केला असता तात्काळ वन कर्मचारी उपस्थित झाले. हा बिबट्या नर जातीचा असून त्‍याच्‍या शरीरावर जखमा दिसून आल्या. पायाचे नखेही काढून घेतलेले असल्याची प्राथमिक अंदाज वन कर्मचारी यांनी व्यक्त केला. नेमका बिबट्या कसा मेला या तपास सुरू आहे.  पशु संवर्धन विभागाचे अधिकारी यांना घटनास्थळीच पाचारण  करण्यात आले. घटनास्थळी  शवविच्छेदन करण्यात आले. पंचनामा दरम्यान बिबट्याची लांबी १९० सेमी, रूंदी ४५ सेमी मोजण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यातील वन विभागाचे सहा वनसंरक्षक गणेश रणदिवे व नवापूर वन क्षेत्रातील वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल ए एन जाधव, एस एल कासार, पी बी मावची, वनरक्षक बी बी गायकवाड, एस बी गायकवाड आदीनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. येथून १०० मीटर अंतरावर जिल्हा परिषद मराठी शाळा असल्याने पालकांच्या  मनातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


मृतदेहाच्या प्राथमिक पंचनामा नुसार 
बिबट्याच्या पोटात कोंबडीचे अवशेष मिळून आले. बहुधा मृत कोंबडी खाल्ल्याने बिबट्यास विषबाधा झाल्याने मृत्यू झाला असावा असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र बिबट्याच्या डोक्यावर आणी पाठीवर झालेल्या जखमा तसेच पंजाची गायब असलेली नखे पाहता ही शिकार झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक शिकार झाली असल्याची शक्यता  वनविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली असल्याने मोठा गुंता निर्माण झाला असून बिबट्याच्या शिकारीची घटना दडपण्याचा प्रयत्न वनविभागाने सुरु केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय जर नखेच गायब झाली तर बिबट्याची कातडी तशीच का राहिली ? घटना नेमकी शहरालगत का घडली ?  की मृत्यु झालेल्या बिबट्याची नखे आधीच लंपास केली गेली ? हे प्रश्न निर्माण झाले असून याचा वनविभागाने छडा लावावा अशी अपेक्षा वन्यजीव प्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान शवविच्छेदन झाल्यावर बिबट्याच्या अवयव तपासणी साठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, व्हिसेराही राखून ठेवण्यात आला आहे. बिबटय़ाचा मृतदेह जाळून नष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणी कसून चौकशी व्हावी अशी अपेक्षा वन्यजीव प्रेमींकडून व्यक्त होते आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... मृत बिबट्याचे फोटो... 

बातम्या आणखी आहेत...