आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला 3 हजार छायाचित्रांमधून शोधले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरणात मुख्य संशयीत रेवनाथ पवार (भगत) याला अटक करण्यात आली. पीडित बालिकेने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे तीन हजार नागरिकांचे छायाचित्र संकलित करण्यात आले. त्यातील काही छायाचित्रे  बालिकेला दाखवण्यात आली. त्यानंतर  या प्रकरणातील अाराेपी सापडला. अाराेपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पाेलिसांनी दिली.


नराधमाचा शोध घेण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी विशेष अाठ अधिकाऱ्यांचे पथक स्थापन केले होते. पथकाने पीडित बालिकेला विश्वासात घेतले. त्यानंतर तिने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे लाल  रंग असलेल्या दोंडाईचामधील सुमारे ३०० मोटारसायकली व त्यांच्या चालकांची चौकशी करण्यात आली.  शिवाय काळ्या रंगाचा शर्ट परिधान करणाऱ्यांवरही पोलिस नजर ठेवून होते. बालिकेवर अत्याचार करणारा नूतन विद्यामंदिराच्या  परिसरातील असावा, असा पोलिसांचा अंदाज होता.

 

त्यामुळेच शाळेसह परिसरात राहणाऱ्या सुमारे तीन हजार लोकांचे फोटो संकलित करण्यात आले. त्यातील संशयितांची माहिती जमा करण्यात आली. त्यानंतर काही संशयितांची छायाचित्रे पीडित बालिकेला दाखविण्यात आली. त्यातील रेवनाथ रामसिंग पवार (वय ३५) याच्या  छायाचित्राला बघून ती घाबरली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. शिवाय घटनेच्या दिवसापासून तो गावातून बेपत्ता होता. त्यामुळे पोलिस त्याचा शोधही घेत होते. त्यानंतर शनिवारी रात्री तो घरी आला असता पोलिसांनी त्याला अटक केली. विचारपूस केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.


दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकातील डीवायएसपी  संदीप गावित,  दोंडाईचाचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, एलसीबीचे सहायक निरीक्षक पी. बी. राठोड, निजामपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी दिलीप खेडकर, आझादनगरचे उपनिरीक्षक हनुमंत उगले, नविता घुगे, नंदुरबारच्या उपनिरीक्षक गीतांजली सानप, मालेगावच्या उपनिरीक्षक पूनम राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली. पत्रकार परिषदेला जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार यांच्यासह पथकातील प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


अाराेपीस अंगलट करण्याची सवय
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिस रेकॉर्डवरील सर्वच गुन्हेगारांची माहिती तपासण्यात आली. याशिवाय छेडखानीमधील संशयितही तपासण्यात आले. त्यातून रेवनाथ याचे नाव पुढे आले. तो लहान मुलींभोवती फिरून अंगलट करण्याचा प्रयत्न करतो. तसेच एका लग्नकार्यात तर ताे बालिकेचा हात धरून होता, अशी माहितीही समोर अाल्याचे पाेलिसांनी सांगितले.

 

इतरांचाही शोध सुरू   
पीडित बालिका नूतन प्राथमिक  विद्यामंदिरात शिकत होती. पीडित बालिकेवर अत्याचार झाल्याचे लक्षात आल्यानंंतर तक्रार देण्याऐवजी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे संस्थेचे पदाधिकारी तथा माजी मंत्री डॉ. हेमंत भास्कर देशमुख, रवींद्र भास्कर देशमुख, महेंद्र आधार पाटील, प्रतीक शरद महाले, नंदू गुलाब सोनवणे यांच्याविरुद्ध  गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी महेंद्र कोठडीत आहे. तर इतरांच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

दहाची नोट ठरणार पुरावा   
घटनेच्या दिवशी आपल्याकडे फक्त १२ रुपये होते. त्यापैकी दोन रुपयांचे चॉकलेट घेतले. याच चॉकलेटचे आमिष बालिकेला दाखवले. चॉकलेट देऊन तिला पडीक घरात नेले. या वेळी बालिकेने एक व स्वत: असे दोन चॉकलेट खाल्ले. तिच्यावर अत्याचार केल्यानंतर पळ काढताना दहा रुपयांची नोट मात्र तेथेच पडली, अशी माहिती संशयित पवारने पोलिसांना दिली आहे. आता याच नोटेवरील हाताचे ठसे त्याच्याविरुद्ध पुरावा म्हणून वापरले जाणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.  

बातम्या आणखी आहेत...