आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सख्ख्या भावाचा खून; पुरावा नष्‍ट करण्‍यासाठी शेतात जाळला मृतदेह, हे होते कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथे सख्ख्या भावाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळणाऱ्या रतिलाल उर्फ प्रभू शांताराम माळी याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश चांडक यांनी हा निकाल दिला. आरोपीने न्यायालयात केलेल्या घूमजावनंतर डीएनए चाचणीचा अहवाल आणि सहायक सरकारी वकील पराग पाटील यांचा प्रभावी युक्तिवाद या खटल्यात प्रभावी ठरला.

 

मेथी येथील जितेंद्र उर्फ बापू शांताराम माळी यांच्या मानेवर फावडीने दोनदा वार करून रतिलाल शांताराम माळी याने खून केला. यानंतर लहान भाऊ जितेंद्र याचा मृतदेह बैलगाडीने शेताजवळील नाल्यात नेऊन कपाशीच्या काड्यांनी पेटवून दिला होता. याशिवाय मृतदेहाची काहीअंशी राख झाल्यामुळे निरगुडीच्या झाडात टाकून पुरावा नष्ट केला होता. शिंदखेडा पोलिसांत दाखल या खटल्यामध्ये पोलिस निरीक्षक आर.बी. शेडे यांनी तपास केला. त्यानंतर धुळे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले. न्या. चांडक यांच्यासमोर कामकाज झाले. या वेळी फावडी व रतिलालच्या कपड्यांवर मिळालेले रक्ताचे डाग, मृत जितेंद्र, रतिलाल व त्यांच्या आई-वडिलांच्या रक्ताचे नमुने व मृतदेहाची राख डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आले.

 

यामुळे रतिलालचा खोटेपणा सिद्ध झाला. या खटल्यात ९ ते १० साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षातर्फे पराग पाटील यांनी बाजू मांडली. सक्षम युक्तिवाद, पुरावे व संदर्भ देऊन रतिलालने भावाचा खून केल्याचे त्यांनी न्यायालयासमोर सिद्ध केले. त्यावर न्या.चांडक यांनी भादंवि कलम ३०२नुसार रतिलालला जन्मठेप व तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने कैद, तर पुरावा नष्ट केल्याचा आरोपाखाली एक वर्ष शिक्षा व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली.

 

काय घडले त्या दिवशी
रतिलाल व जितेंद्र यांच्यात वाद होते. वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ जितेंद्र करत होता. दि. १५ एप्रिल २०१४ रोजी कपाशीने भरलेली बैलगाडी शेतात रुतल्यामुळे रतिलालने जितेंद्रची मदत मागितली. त्याने नकार दिल्याने राग आला. मध्यरात्री जितेंद्र शेतातील बैलगाडीत झोपला असताना रतिलालने त्याचा खून केला.

 

रिपोर्ट ठरला महत्त्वाचा
अनेक जटिल गोष्टी न्यायालयासमाेर आणून दिल्या. जितेंद्रचा खून मी केला नाही, तो कुठे आहे मला माहीत नाही असा घूमजाव रतिलालने केला. त्यामुळे डीएनए चाचणी केली. त्याचा अहवाल महत्त्वाचा ठरला. रतिलालचा सर्व क्रूरपणा न्यायालयासमाेर आणला.
-अॅड पराग पाटील, सहा.सरकारी वकील

बातम्या आणखी आहेत...