आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टवाळखोराकडून जप्त केली छऱ्यांची बंदूक; संशयितावर केली प्रतिबंधात्मक कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री गस्त घालत असताना एका टवाळखोराकडून छऱ्यांची बंदूक आणि चॉपर जप्त केला. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 


टवाळखाेराकडे गावठी कट्टा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे काही दिवसांपासून पथकाने त्याच्यावर नजर ठेवली. अखेर सोमवारी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्याचे रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, विजय पाटील, अतुल पाटील, विजय श्यामराव पाटील, मनोज सुरवाडे, हेमंत कळसकर आदींच्या पथकाने टवाळखोरास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चॉपर व छऱ्यांची बंदूक जप्त करून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईकरण्यात अाली. ही बंदूक ही हुबेहूब गावठी कट्ट्याप्रमाणे दिसते आहे. त्यातून केवळ छर्रे उडवले जातात; परंतु गावठी कट्ट्याप्रमाणे दिसत असल्यामुळे धाक दाखवण्यासाठी टवाळखोर तिचा वापर करीत असतात. गेल्या वर्षी धुळे जिल्ह्यात अशाच प्रकारच्या बंदुकीचा धाक दाखवून रस्तालूट करीत दीड लाख रुपये लांबवल्याची घटना घडली होती. यातील दोन संशयित जळगाव शहरातील होते. त्यांना शहर पोलिसांनी अटकही केली होती. 


चोरीच्या उद्देशाने फिरत असलेल्या एकास पकडले 
एमअायडीसीच्या याच पोलिसांच्या पथकाने सोमवारी रात्री शहरातील लक्ष्मीनगर परिसरातून शेखर साहेबराव सोनवणे (वय २५, रा.लक्ष्मीनगर) याला ताब्यात घेतले. शेखर व त्याचा साथीदार ललित उमाकांत दीक्षित हे दोघे सम्राट कॉलनी, कासमवाडी, ईश्वर कॉलनी या भागात चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत होते. 


शेखर हा आडदांड असल्यामुळे या परिसरात त्याची दहशत आहे. नागरिक त्याची तक्रार देण्यास धजावत नाहीत. तो घरफोडीसारखा गंभीर प्रकार करण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. 


ऑनलाइन खरेदी केला चॉपर 
टवाळखोराने ऑनलाइन पद्धतीने चॉपर खरेदी केला आहे. आकर्षक बनावटीचा हा चॉपर अत्यंत धारदार व धोकादायक आहे. परंतु त्याची लांबी ९ इंचापेक्षा कमी असल्यामुळे बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याचा गुन्हा दाखल होऊ शकला नाही; परंतु, त्याच्या या कृतीमुळे पोलिसांनी त्याला खाक्या दाखवत कारवाई केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...