आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 मार्केटच्या गाळेधारकांची रणरणत्या उन्हात कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - 'बंद करा, बंद करा, हुकूमशाही बंद करा, बेकायदा भाडे कमी झालेच पाहिजे, गाळे करार नूतनीकरण झालेच पाहिजे, व्यापाऱ्यांचे मरण विकासाला ग्रहण..' अशा लक्ष्यवेधी घाेषणाचे फलक हातात घेऊन रणरणत्या उन्हात २० व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी मंगळवारी १०० टक्के व्यापार बंद ठेवत कुटुंबातील सदस्य, कामगार व व्यापाऱ्यांनासाेबत घेत मूकमाेर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली. मनपा प्रशासनाकडून अवलंबण्यात येणाऱ्या कारवाईमुळे हताश झालेल्या गाळेधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांसमाेर टाहाे फाेडत अापल्या भावनांना वाट माेकळी करून दिली. न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील. एक रईस गेला अाणखी रईस जातील, कारण गाळे हातून गेल्यास अात्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही, असे भावनिक अावाहन प्रशासनाला करण्यात अाले. अामदार सुरेश भाेळेंनी न्याय न मिळाल्यास अामदारकीचा राजीनामा देण्याची घाेषणा केली तर माजी मंत्री एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत जळगावात सुरू असलेल्या अांदाेलनाची माहिती पाेहचवली.


या मार्केटमधील गाळेधारकांचा हाेता सहभाग
फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, छत्रपती शाहू मार्केट, वालेचा मार्केट, डाॅ. बाबासाहेब अांबेडकर मार्केट, डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान मार्केट, जुने बी.जे. मार्केट, भास्कर मार्केट, जुने शाहू मार्केट, नानीबाई अग्रवाल मार्केट, गेंदालाल मिल मार्केट, चाैबे मार्केट, टाॅवर,गांधी मार्केट, धर्मशाळा मार्केट.
 

फलकांनी वेधले लक्ष
भाऊ, दादा, ताई, पंत अापल्याला नाही अामची खंत?, व्यापाऱ्यांचा घाम, करेल अॅसिडचे काम, चाेर साेडून सन्याशाला फाशी, कुठे अाणून ठेवला जळगाव माझा, काेण म्हणत देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, बंद करा, बंद करा, हुकूमशाही बंद करा, अापला खेळ हाेत अाहे, अामचा जीव जात अाहे, दुकान अामच्या मालकीचे, नाही कुणाच्या बापाचे, बेकायदा भाडे कमी झालेच पाहिजे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे अाेझे, गाळे करार नूतनीकरण झालेच पाहिजे, व्यापाऱ्यांचे मरण विकासाला ग्रहण अादी घाेषणाचे फलक हाेते.

 

खडसेंनी मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद
माजी मंत्री एकनाथ खडसेंनी गाळेधारकांशी फाेनवरून संवाद साधला. या वेळी त्यांनी माेर्चाबाबत माहिती देण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे सांगितले. माझा गाळेधारकांना पाठिंबा असून गाळेप्रश्नी मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांसाेबत बैठक अायाेजित करण्यासाठी विनंती करेल. जाेपर्यंत प्रश्न सुटत नाही, ताेपर्यंत मी तुमच्या साेबत अाहे. शासन व महापालिका प्रशासनाची बैठक अायाेजित करणार असल्याचे सांगितले.

 

सुमारे २० काेटींची उलाढाल ठप्प
शहरात मंगळवारी २० मार्केट बंद असल्यामुळे सरासरी २० काेटीची उलाढाल ठप्प झाल्याचे सांगितले जात अाहे. यात रमेश मताणी यांनी २५ काेटी, हिरानंद मंधवाणी यांनी ३० काेटी, डाॅ. शांताराम साेनवणे यांनी २० काेटी रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगितले. तसेच मार्केट बंद असल्यामुळे खरेदीसाठी अालेल्याचे हाल झाले.

 

माेर्चामुळे शासनाला नक्कीच विचार करावा लागेल : साेनवणे
गाळेधारकांच्या जटील प्रश्नाबाबत बाेलताना डाॅ. शांताराम साेनवणे यांनी शाहू मार्केटमधील रईस शेख या व्यक्तीचे उदाहरण दिले. अापल्या मुलाची मागणी पूर्ण करू न शकल्याचे शल्य मनी बाळगणाऱ्या रईसने जीवनयात्रा संपवल्याचे सभेत सांगितले. गाळेधारकांचीही अशीच परिस्थिती असल्याची जाणीव करून देत या माेर्चामुळे शासनाला नक्कीच विचार करावा लागेल, असा विश्वास व्यक्त केला. जिल्ह्यातील सर्व अामदार, खासदारांनी एक दिवस वेळ द्यावा. मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाण्याची जबाबदारी स्वीकारताे असेही सांगितले. युसूफ मकरा यांनी व्यापारी महामंडळ गाळेधारकांसाेबत असल्याचे सांगितले. व्यापाऱ्यांची अडचण व्यापारी जाणू शकताे. पाच रुपयांची पुडी बांधणारा पाच लाखांचे बिल कसे भरणार, असा सवालही केला. पुरुषाेत्तम टावरी यांनी महाराष्ट्र चेंबर अाॅफ काॅमर्सचा गाळेधारकांना पाठिंबा अाहे. शासनासाेबत चर्चा करायची असल्यास त्यालाही तयारी असल्याचे सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...