आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ- भुसावळातील शासकीय धान्य गोदामाची अामदार एकनाथ खडसे, आमदार संजय सावकारे, जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी शुक्रवारी तपासणी केली. यावेळी रेशन दुकानांवर वितरण होणाऱ्या गोण्यांमध्ये धान्य कमी सापडले. या गैरव्यवहार प्रकरणी शनिवारी मुंबईहून अालेल्या मंत्रालयातील पथकाने दप्तर तपासणी सुरू केली आहे. मंगळवारपर्यंत तपासणी करून आठवडाभरात अहवाल दिला जाणार आहे.
शासकीय गोदामातून स्वस्तधान्य दुकानदारांना वितरित होणाऱ्या ५० किलोच्या गोणीमागे पाच ते सहा किलो धान्य कमी दिले जाते. याबाबत शुक्रवारी खडसे यांनी झाडाझडती घेतली होती. प्रत्यक्ष मोजमाप करून या प्रकारातील सत्यता पडताळण्यात आली. यानंतर खडसेंनी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव, सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून खडे बोल सुनावले होते. या तक्रारीची गंभीर दखल घेत शनिवारी मंत्रालयातील पुरवठा विभागाचे सहायक संचालक पद्माकर गांगवे व त्यांचे सहायक म्हणून लिपिक नीलेश जाधव यांचे पथक भुसावळात दाखल झाले. शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी पुन्हा तीन सदस्यांचे पथक मुंबईतून भुसावळात दाखल होणार आहे. शनिवारी पथकाने सकाळपासून गोदामाचा ताबा घेऊन कागदपत्रे, धान्य प्रमाणिकीकरण रजिस्टरची तपासणी केली. सलग तीन दिवस तपासणी करून अहवाल पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना दिला जाणार आहे. दप्तर तपासणीवेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे उपस्थित होते.
पाळेमुळे शोधणार
धान्य गोदामातील प्रत्येक गोणीतून धान्य कमी कसे होते, या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढू. तीन दिवसांत चौकशी होईल. चौकशी पूर्ण होईपर्यंत भुसावळ सोडणार नाही. याबाबत विस्तृत अहवाल मंत्रालयात पाठवला जाईल.
- पद्माकर गांगवे, सहायक संचालक, पुरवठा विभाग
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.