आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक; शिक्षक नव्हे सैतान !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील एका अल्पवयीन मुलीवर अज्ञात व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने समाजमन पेटून उठले आहे. याप्रकरणी ही मुलगी ज्या शाळेत शिक्षण घेत होती त्या शाळेतील महेंद्र पाटील नामक शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी अज्ञात असला तरी शाळेची बदनामी नको म्हणून प्रकरण दाबण्यासाठी शिक्षक महेंद्र पाटील आणि संस्थेचे पदाधिकारी माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्यासह काहींनी प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अर्थात, यात सत्यता आणि राजकारण किती, हेही तपासले गेले पाहिजे. पीडित मुलगी जळगावात नातेवाइकांकडे आली आणि त्यांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता, तिच्यावर अत्याचार झाल्याची बाब उघड झाली. पीडित मुलीच्या नातेवाइकांनी या घटनेला वाचा फोडल्यामुळे प्रकरण पोलिसात गेले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी आरोपीचा छडा लावण्यात अजून त्यांना यश आलेले नाही. अत्याचारी इसमाचा शोध घेऊन त्याला शिक्षा व्हावी म्हणून दोंडाईचासह नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर येथे तेली समाज संघटनेच्या पुढाकाराने अन्य समाजाला सोबत घेत निषेध मोर्चा काढला. टप्प्या-टप्प्याने राज्यभर निषेध मोर्चे काढण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. दोंडाईचा येथील घटनेचा छडा लागत नाही, तोच अमळनेर तालुक्यातील कळमसरे जिल्हा परिषदेच्या शाळेत एकापेक्षा अधिक अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या संशयावरून शिक्षक जगदीश भास्कर पाटील यास दोन दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली. घरी वाच्यता करू नये म्हणून हा शिक्षक मुलींना धमकावत होता. एका मुलीने धाडस दाखवून आपल्या पाल्यांना घटना सांगितली. त्यानंतर संतप्त पालक शाळेत आले आणि घटना उघड झाली. विशेष म्हणजे चार मुलींच्या पालकांनी दिलेल्या तक्रारींवरून शिक्षकाविरुद्ध चार गुन्हे दाखल झाले आहेत. 


अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या घटना समाजात वेगवेगळ्या शहरात अनेकदा घडल्या आहेत. त्यामागे विकृत मनोवृत्तीचे लोक असल्याचे तपासाअंती समोर आले आहे; पण ज्या ज्ञानमंदिरात शिक्षण आणि संस्काराचे धडे देण्याची जबाबदारी ज्या शिक्षकावर आहे, तोच जर विकृत झाला असेल तर ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चे स्वप्न कुणाच्या बळावर साकार करायचे? शाळेतील अल्पवयीन मुलींवर शिक्षकांकडून अत्याचार झाल्याची ही पहिली, दुसरी घटना नाही. राज्यभरात अनेक वेगवेगळ्या शहरांमध्ये या घटना घडल्या आहेत. काही घटनांमधून शिक्षकाचे मानसिक संतुलन ढासळल्याचे प्रकारही घडत आहेत. कधी गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचे प्रकारही घडत आहेत. संतुलन आणि संयम सुटलेले शिक्षक काय करू शकतात याचे आणखी एक ताजे उदाहरण भडगाव ( जि. जळगाव) येथील सांगता येईल. भडगाव तालुक्यातील पथराड येथील शाळेत पाचवी इयत्तेत शिक्षण घेणारा विजय कैलास चव्हाण या विद्यार्थ्याने त्याच्याच वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला लाथ मारल्यामुळे संतप्त शिक्षकाने त्या विद्यार्थ्याचा गळा आवळला आणि त्यात त्याचा जीव गेल्याची घटना गत २४ फेब्रुवारी रोजी घडली. पालकांच्या जागरूकतेमुळे शाळेतील दोघा शिक्षकांसह लिपिकाला अटक करण्यात अाली आहे. प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून सदर मुलाने आत्महत्या केल्याचे दर्शवण्यात आले होते. शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी जो अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो, त्यामध्ये बाल मानसशास्त्र हा विषय प्राधान्याने घेतला जातो. शिक्षकाने विद्यार्थ्याशी कसे वागावे आणि त्यांच्याकडून अभ्यास कसा करून घ्यावा, हे बाल मानसशास्त्र शिकवतो; पण अनेक शिक्षकांनी आपल्या व्यवसायाची नीतिमूल्य पायदळी तुडवली आहेत. शिक्षकी पेशा हा पवित्र आहे, याचे भानही तो विसरला आहे. या सर्व घटना पाहिल्या तर शिक्षक हा शिक्षक राहिला नसून तो सैतान झाला आहे. काही घटनांमधून शिक्षकांमधील सैतान समाजाला दिसला; पण जे अजून दिसले नाही त्यांचे काय? अशीही चर्चा यानिमित्ताने होऊ लागली आहे. एकेकाळी शिक्षकावर पालकांचा पूर्ण विश्वास असे, शिक्षकाच्या भरोशावर मुलींना सोडून पालक निर्धास्त असत; पण आजकाल चांगला आणि वाईट शिक्षक ओळखणे अवघड झाले आहे. शिक्षकांमधील काही सैतानांनी शिक्षण व्यवस्था नासवून टाकली आहे. त्यामुळे भविष्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटना टाळायच्या असतील तर शिक्षण व्यवस्थेत कमालीचे बदल करण्याची गरज आहे. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’ ही उक्ती शिक्षण क्षेत्रातही लागू पडते. म्हणून शालेय शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी महिला शिक्षकांवर सोपवली तर ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चे स्वप्न साकार करताना अल्पवयीन मुलींना सुरक्षादेखील प्राप्त होईल, असे वाटते.  

 

- त्र्यंबक कापडे, निवासी संपादक, जळगाव

बातम्या आणखी आहेत...