आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसटीला व्हीटीएस यंत्रणा; पायलट प्रोजेक्टसाठी नाशिकची निवड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राज्य परिवहन मंडळाच्या बसेस कोणत्या मार्गावर धावत आहे, कोणत्या थांब्यावर थांबणार असून नियोजित ठिकाणी किती वेळेत पोहोचणार याबाबतची माहिती प्रवाशांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यासाठी राज्यातील सर्व बसेसला व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम अर्थात व्हीटीएस यंत्रणा बसवण्यात येणार आहे.

 

या पायलट प्रोजेक्टसाठी नाशिक विभागाची निवड करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात ५०६ बसेसला ही यंत्रणा बसवली जाणार आहे. या यंत्रणेमुळे अॅपच्या मदतीने बसेसबाबतची सर्व माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.   


खासगी प्रवासी वाहतुकीसोबत स्पर्धा करताना राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना अधिकाधिक सोयी-सुविधा मिळावी याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिवहन मंडळाच्या सर्व १८००० बसेसला व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम यंत्रणा बसवली जाणार आहे. या यंत्रणेमुळे बस सद्य:स्थितीत कोणत्या मार्गावर धावत, कोणत्या थांबा अथवा बसस्थानकावर थांबणार आहे
याबाबतची सर्व माहिती प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.

 

या यंत्रणेमुळे बसस्थानकावर बस कोणत्या वेळी पोहोचणार आहे याबाबतची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. याचमुळे बसची तासन् तास वाट बघण्यापासून प्रवाशांची सुटका होणार आहे. ही यंत्रणा बसवण्यासाठी पायलट प्रोजेक्टअंतर्गत नाशिक विभागातील नाशिक डेपो-१, मनमाड, सिन्नर, येवला, पिंपळगाव, लासलगाव या बसस्थानकांतील ५०६ बसेसला यंत्रणा एका खासगी संस्थेद्वारे बसवली जाणार आहे.


यासाठी बसेसच्या मार्गांचे सर्वेक्षण करण्यात येत असून लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याची माहिती एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.  

 

बसस्थानक, थांब्यावर बसवणार स्क्रीन   
बसेस कोणत्या मार्गावर सद्य:स्थितीला धावत आहे, कधीपर्यंत बसस्थानकावर पोहोचणार याबाबत माहिती होण्यासाठी बसस्थानक तसेच अधिकृत बस थांब्यांवर डिस्प्ले स्क्रीनदेखील बसवले जाणार आहेत.  व्हीटीएस यंत्रणा तसेच अॅपमुळे प्रवाशांना एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांना एसटी प्रवास खऱ्या अर्थाने सोयीस्कर ठरणार आहे. तसेच या यंत्रणेच्या उपयोगामुळे प्रवासी वाढण्याबरोबरच एसटीच्या उत्पन्नातदेखील भर पडणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...