आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप नगरसेवकांसाठी आणखी 12 कोटी निधी; मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निधीचा वाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- नांदेड येथून नंदुरबारला जात असताना जळगावात भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या हेलिकाॅप्टरचे जळगावात जैन हिल्सवर लॅडिंग करण्यात अाले. या वेळी अर्धा तासाच्या विश्रांतीमध्ये खासदार दानवे यांनी भाजप नगरसेवक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या २५ कोटींच्या निधीपैकी बहुतांश कामे सत्ताधारी खाविआ नेत्यांच्या प्रभागात केली जात असून निधीचे असमान वाटप झाल्याबद्दल भाजप नगरसेवकांचे गाऱ्हाणे दानवेंनी ऐकून घेतले. आणि अखेर खास भाजप नगरसेवकांच्या वार्डांमधील कामांसाठी महिनाभरात आणखी १२ कोटींचा निधी मिळवून देऊ, असे अाश्वासन देऊन दानवेंनी नाराज नगरसेवकांची समजूत काढली. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपाला दिलेल्या २५ कोटी रुपयांच्या खास निधीतून बहुतांश कामे सत्ताधारी खान्देश विकास आघाडीच्या नेत्यांनी पळवल्याने भाजप नगरसेवक नाराज झाले आहेत. शुक्रवारी भाजपच्या बैठकीत नगरसेवकांनी आपल्या तीव्र भावना आणि आमदारांबद्दल असलेली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती.त्या पार्श्वभूमीवर शनिवारी नाराज नगरसेवकांनी दानवे यांची भेट घेतली. वास्तविक, नांदेड जिल्ह्यातील किनवट येथून खासदार दानवे धुळे-नंदुरबार जिल्ह्याच्या दाैऱ्यावर निघाले हाेते. नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारसभा अाणि सारंगखेडा येथील यात्रेला ते उपस्थित राहणार अाहेत. 


किनवट ते नंदुरबारच्या प्रवासात जळगाव येथे जैन हिल्सवर दुपारी इंधन भरण्यासाठी थांबणार असल्याची पूर्वकल्पना शुक्रवारीच गृह विभाग प्रशासनाला देण्यात अाली हाेती. त्यानुसार दुपारी वाजता दानवेंचे हेलिकाॅप्टर जैन हिल्सवर दाखल झाले. या वेळी खासदार टी पाटील, अामदार सुरेश भाेळे, भाजपचे महापालिकेतील गटनेते सुनील माळी, नगरसेवक पृथ्वीराज साेनवणे, दीपक सूर्यवंशी यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित हाेते. जळगाव शहरातील २५ काेटी रुपयांच्या निधीसंदर्भात लवकर ताेडगा काढण्यासाठी नगरसेवकांनी खासदार दानवेंना निवेदन दिले. या वेळी खासदार दानवेंनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी फाेनवर चर्चा केली. तसेच येत्या अधिवेशनामध्ये पालकमंत्र्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचे अाश्वासन दिले. 


भाजप नगरसेवकांच्या वार्डातील कामांसाठी येत्या महिन्याभरात १२ काेटी रुपयांचा निधी देण्याचे अाश्वासन खासदार दानवे यांनी दिल्याची माहिती सुनील माळी यांनी दिली. दुपारी ४.३० वाजता खासदार ए. टी. पाटील यांना साेबत घेऊन दानवेंचे हेलिकाॅप्टर नंदुरबारला रवाना झाले. 


२५काेटींच्या कामांवर डल्ला मारण्यासाठी खाविआ-भाजपमध्ये रस्सीखेच: चाैधरी 
अडीचवर्षांपासून विकासासाठी तरसणाऱ्या लाख जळगावकरांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या २५ कोटी रुपयांचा अजूनही याेग्य विनियाेग झालेला नाही. सत्ताधारी खाविआ - मनसे भाजपमध्ये २५ काेटींच्या कामांवर डल्ला मारण्यासाठी रस्सीखेच सुरू असल्याचा अाराेप जळगाव फर्स्टचे समन्वयक तथा काँग्रेसचे महानगर कार्याध्यक्ष डाॅ.राधेश्याम चाैधरी यांनी पत्रकाद्वारे केला अाहे. अाठवड्यात निधीचा राजकीय वाद मिटल्यास अांदाेलनाचा इशारा त्यांनी दिला अाहे. 


शहरातील प्रश्नांकडे मान-अपमान, श्रेयवाद यांच्या पलीकडे जाऊन बघण्याची गरज असताना २५ कोटीच्या प्रस्तावित विकास कामांना खोडा घालण्याचा करंटेपणा मनपातील राज्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी करीत अाहेत. मनपातील सत्ताधारी खाविआ राज्य-केंद्रात सत्तेत असलेली भाजप या दोघांमधील पोरकट, स्वार्थी वादामुळे जळगावकर नाहक भरडले जात आहेत. या २५ कोटींच्या निधीवर खाविआ भाजपपेक्षाही लाख जळगावकरांचा जास्त हक्क आहे. खाविआ भाजपच्या नेत्यांनी उंदीर-मांजराचा खेळ थांबवून नवीन १०० कोटी निधीसाठी प्रयत्न करावा, असेही चाैधरी यांनी म्हटले अाहे. 


जळगाव महापालिकेला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या २५ काेटींच्या निधीसंदर्भात नगरसेवकांनी खासदार दानवे यांच्याकडे मंजूर कामाची यादी साेपवली. यात अापल्या भागातील कामाची देखील यादी हाेती. निधीचे समान वाटप हाेणे अावश्यक असल्याची मागणी नगरसेवकांनी केली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अाणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अामदार भाेळे यांच्याशी चर्चा करून निधी वितरणाबाबत लवकरच ताेडगा काढण्याचे अाश्वासन खासदार दानवे यांनी दिले. या वेळी शहर जिल्ह्यातील पक्षीय संघटनासंदर्भात त्यांनी खासदार ए.टी.पाटील,अामदार भाेळे यांच्याशी चर्चा केली. 

बातम्या आणखी आहेत...