आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाई-वडील बाजारात गेले असताना घरात १५ वर्षांच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील इंद्रनील साेसायटीतील १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याने अाई-वडील कामाच्या निमित्ताने बाजारात गेले असताना दुपारी २.३० वाजता शाळेतून घरी अाल्यावर गळफास घेतला. अाई-वडील घरी परतल्यावर हा प्रकार उघडकीस अाला. त्यांनी त्याला तातडीने खाली उतरवले, तेव्हा त्याचा श्वास सुरू हाेता. रिक्षेतून रुग्णालयात पाेहाेचवण्यापूर्वीच वाहतूक काेंडीतून मार्ग काढताना उशीर झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने समाजमन सुन्न झाले अाहे. वैभव ऊर्फ गोलू अशोक पाटील असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. 


वडीलांचा व्यवसाय दूध वाटपाचा 
वैभवचे वडील हे अंजनविहिरे (ता. धरणगाव) येथील रहिवासी अाहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून जळगावातील इंद्रनील सोसायटीत कुटुंबीयांसोबत वास्तव्यास आहेत. त्यांचा दूध वाटपाचा व्यवसाय आहे. गुरुवारी रात्री उशिरा वैभववर अंत्यसंस्कार झाले. दरम्यान आत्महत्येपूर्वी वैभव शाळेतून नुकताच घरी आला होता. त्याने आत्महत्या का केली? हे स्पष्ट हाेऊ शकले नाही. मृत वैभवचा भाऊ मयूर हा सातवी शिक्षण घेताे. नगरसेवक अमर जैन यांनी मृताच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. अशा घटना घडू नये म्हणून शाळांमध्ये समुपदेशन करावे, अशी अपेक्षा नातेवाइकांनी व्यक्त केली. 


शहरात सहा महिन्यातील तिसरी घटना 
डिसेंबर २०१७ : जळगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका १३ वर्षीय मुलाने आत्महत्या केली होती. हा मुलगा आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. 
३ जानेवारी : रामानंदनगर परिसरातील जागृती हाउसिंग सोसायटी येथील गौरव प्रकाश सोनवणे (वय १७) या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 
९ फेब्रुवारी : शहरातील आदर्शनगरात राहणाऱ्या यश नितीन इंगळे (वय १५) या दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्याने बेडशीट पंख्याला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 


शाळेतून येताना वैभव आनंदात 
वैभव हा शाळेतून येत असताना आनंदात होता. रिक्षेत त्याने इतर मित्रांसोबत मस्ती देखील केली होती. अशी माहिती त्याला शाळेतून घरी आणणाऱ्या रिक्षाचालकांनी दिली. तर दोन दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांनी दीड हजार रुपयांची क्रिकेटची बॅट त्याला घेऊन दिली होती. शाळेत त्याचे कोणाशी भांडण झाल्याची माहिती समोर आली नाही. आत्महत्या करण्यासाठी ठोस कारण नसताना वैभवने घरी येऊन थेट वरच्या मजल्यावर जाऊन गळफास घेतला. त्यामुळे कुटंुबीय देखील चक्रावले आहेेत. घटनेनंतर नागरिकांनी त्याच्या शाळेच्या बॅगची तपासणी केली. त्यातही काही आक्षेपार्ह आढळून आले नाही. 

बातम्या आणखी आहेत...