आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमुख चौक, रस्ते, बसस्थानकाबाहेर झुरके घेणाऱ्या ५७ जणांना केला दंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- सार्वजनिक ठिकाणांवर विडी, सिगारेटचे झुरके घेणारे, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या ५७ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली अाहे. गुरुवारी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांसह वाहतूक शाखेच्या पथकाने एकाच वेळी ही धडक कारवाई केल्यामुळे खळबळ उडाली. अट्टल गुन्हेगारांविरोधात एकाचवेळी सर्व पोलिस ठाण्यांनी मंगळवारी रात्री कोम्बिंग आॅपरेशन केले होते. शहरातील गुन्हेगारांची रात्रभर झाडाझडती घेण्यात आली होती. त्यापाठोपाठ गुरुवारी दुपारपासून पोलिसांनी रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थांचे खुलेआम सेवन करणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. 


शहरातील प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे, रेल्वेस्थानक, बसस्थानक, शाळा, महाविद्यालयांचा परिसर, मार्केटच्या परिसरात पोलिसांच्या पथकाने तपासणी सुरू केली. पानटपऱ्यांच्या बाहेर सिगारेटचे झुरके घेणाऱ्यांना जागेवरच २०० ते ६०० रुपयांपर्यंत दंड अाकारण्यात आला. शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांनी या सर्व कारवाईचे नेतृत्व केले. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू ठेवण्यात आली होती. 


काय म्हणतो कायदा 
सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा २००३ (कोटपा) नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास प्रतिबंध, सर्व प्रकारच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जाहिरातींचे प्रमोशन, प्रचार आणि तंबाखूच्या उत्पादनांचे संवर्धन व प्रायोजकत्त्वावर प्रतिबंध, बालकांना किंवा बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध, कोणत्या शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड अंतर्गत तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध व सर्व तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटांवर वैधानिक इशारा देणे अनिवार्य आहे. या बाबींचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध 'कोटपा' कायद्यानुसार ही कारवाई होऊ शकते. 


शासकीय कार्यालयांमध्ये समिती 
कोटपा कायद्यानुसार प्रत्येक शासकीय कार्यालयांच्या आवारात धूम्रपान, तंबाखू खाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच कायद्याचे उल्लंघन करणारे शासकीय कर्मचारी, नागरिकांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र समिती तयार करण्याचे आदेशात म्हटले आहे. तीन महिन्यांपूर्वी सिव्हिलमध्ये अशीच समिती स्थापन करून काही जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली हाेती. त्यानंतर पुन्हा कारवाई करणे बंद झाले आहेे. तर इतर शासकीय कार्यालयांमध्ये मात्र अशी कारवाई झालेली नाही.

 
भविष्यात कारवाईत सातत्य राहणार 
कोटपा या कायद्यानुसार नागरिकांच्या आरोग्यासाठी कारवाई करण्यात आली आहे. भविष्यात या कारवायांमध्ये सातत्य ठेवण्यात येणार आहे. 
- दत्तात्रय कराळे, पोलिस अधीक्षक 


कारवाईचे स्वरुप 
- सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना आढळल्यास समझोत्याने कारवाई करून २०० रूपये दंड. 
- समझोता न झाल्यास प्रथम गुन्हा म्हणून १ हजार रुपये दंड व पाच वर्षे कारावास. 
- शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालयांच्या आवारात धूम्रपान करणे, उत्पादक किंवा निर्मात्यांबाबतीत तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यास समझोत्याने सुरुवातीला २०० रुपये दंड, समझोता न झाल्यास पाच हजार दंड, त्यानंतर पुन्हा गुन्हा केल्यास १० हजार रूपये दंड व पाच वर्षे कारावास. 
- विक्रेते किंवा वितरकांनी प्रथम गुन्हा केल्यास १ हजार रूपये दंड व एक वर्ष कारावास, त्यानंतर ३ हजार रुपये दंड व दोन वर्षे कारावास. 
- नियमानुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कुणीही लहान मुलांना मादक द्रव्य, पदार्थ अथवा तंबाखूजन्य पदार्थ देत असल्याचे आढळल्यास त्यास सात वर्षे कारावास व एक हजार रूपये दंड करण्याची तरतूद अाहे. 

बातम्या आणखी आहेत...