आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानगुटीवर बसून निधी खेचणारे नेते असल्याने शहरविकासाची चिंता सोडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहरातील रिंगरोड, भुयारी रेल्वे मार्ग, पालिकेच्या नवीन इमारतीसाठी शासन निधी देईल. शासनाच्या मानगुटीवर बसून निधी खेचून आणणारे खडसे-सावकारेंसारखे नेते तुमच्याकडे असल्याने शहराच्या विकासाची चिंता नको. पालिकेने अमृत योजनेवरील वार्षिक एक कोटी रुपये विजबिलाचा बोझा कमी करण्यासाठी स्वतंत्र सौरऊर्जा प्रकल्प उभारावा. यासाठी प्रस्ताव दिल्यास मंजुरी मिळेल, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. जलशुद्धीकरण केंद्रात अमृत योजनेच्या भूमीपूजनावेळी ते बोलत होते. माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे अध्यक्ष असलेल्या या कार्यक्रमाकडे जलसंपदा मंत्री गिरीष महाजनांनी मात्र पाठ फिरवली. 


व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, खासदार ए. टी. पाटील यांच्यासह अधिकारी-नगरसेवकांची उपस्थिती होती. भूमीपूजनानंतर पालकमंत्री पाटील यांनी, भुसावळ शहरातील रेल्वेच्या भुयारी मार्गाचा प्रश्न जिल्हा नियोजन समितीतून सोडवू. रिंगरोडमुळे शहरातील वाहतूक कोंडी सुटेल. मात्र, त्यासाठी भू-संपादन करावे लागेल का? हा मुद्दा तपासण्यात येईल असे सांगितले. नवीन व्यापारी संकुलांसह पालिकेच्या नवीन इमारतीस मंजुरी निधी देण्याचा शब्दही त्यांनी दिला. शहरातील कचरा ही आता समस्या राहिली नसून त्यातून उत्पन्नवाढीची संधी आहे, असे सांगत पालकमंत्र्यांनी कोल्हापूरचे उदाहरण दिले. सुक्या कचऱ्यापासून कांडी कोळसा, तर ओल्या कचऱ्यापासून महागडे सेंद्रीय खत तयार करता येते, असे ते म्हणाले. 


कार्यक्रमाला डीआरएम आर.के.यादव, सहाय्यक पोलिस अधीक्षक नीलोत्पल, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, फैजपूरच्या नगराध्यक्षा महानंदा होले, सावद्याच्या नगराध्यक्षा अनिता येवले, प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार विशाल नाईकवाडे, मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर यांच्यासह सर्व विषय समिती सभापती, नगरसेवक उपस्थित होते. 


जनआधारची उपस्थिती
पालिकेतविरोधी बाकावर असलेल्या जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी भूमीपूजन कार्यक्रमाला हजेरी लावली. एवढेच नव्हे तर या नगरसेवकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. कार्यक्रमात विरोधी गटातील नगरसेवकांना फेटे बांधून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. अत्यंत महत्वकांक्षी अमृत योजनेमुळे आगामी पाच दशकांसाठी भुसावळ शहराचा पाणीप्रश्न सुटणार आहे. 


रेल्वे हद्दीतील अतिक्रमणधारकांच्या प्रश्नी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत बैठक घेणार 
गेल्या वर्षभरातपथदिवे, गटारी, कचरा संकलन हे प्रश्न मार्गी लावले. आता ओपन स्पेसवर जॉगिंग ट्रॅक, ओपन जीम, नाट्यगृह उभारणी, पालिकेची नवीन इमारत या कामांना प्राधान्य देऊ. कोंडी थांबवण्यासाठी रिंगरोडचा वापर सुरु होईल. 
- रमण भोळे, नगराध्यक्ष 


विरोधकांनी अमृतचेश्रेय लाटण्याचा प्रयत्न चालवला असला तरी पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी नगरोत्थान योजना फोल ठरवली. रस्त्यांच्या कामांना ब्रेक लावणारे आता त्याचे श्रेय लाटत आहेत. आम्ही श्रेयापेक्षा विकासाला महत्त्व देतो.
- संजय सावकारे, आमदार 

 

केंद्र शासनाच्याप्रधानमंत्री आवास योजनेसाठी शहरातून ३४ कोटी रुपयांचा आराखडा पाठवला आहे. रेल्वे बोगदा, स्थानक सुशोभिकरण अन्य कामे सुरू आहेत. अमृत योजनेमधून २४ तास पाणी मिळेल. 
- रक्षा खडसे, खासदार 


निवडणूक काळातदिलेल्या सर्व आश्वासनांची पाच वर्षात पूर्तता होईल. मुंबई ठाणे शहराप्रमाणे रेल्वेच्या जागेवर अतिक्रमणधारकांच्या पुनर्विस्थापनासाठी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत बैठक घेणार आहोत. 
- एकनाथ खडसे, माजी मंत्री 


कार्यक्रम पालिकेचा की भाजपचा? 
अमृत योजनेचा भूमिपूजन समारंभ पालिकेने आयोजित केला होता की भाजपने? असा प्रश्न कार्यक्रमाच्या नियोजनामुळे निर्माण झाला. सत्काराच्या वेळी ‘मै कमल खिलाने आया हू’ हे गीत वाजवले जात होते. सर्व नगरसेवकांना भाजपच्या भगव्या-हिरव्या रंगाचे फेटे बांधण्यात आले होते. मात्र, भाजपच्या काही नाराज नगरसेवकांनी केवळ भगवा फेटा बांधणे पसंत केले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. 

बातम्या आणखी आहेत...