आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीचा हल्लाबोल!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकरी, व्यापारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सर्वसामान्य नागरिक या सर्वांचे प्रश्न सोडवण्यात भाजप सरकार कसे अपयशी ठरत आहे, हे सांगण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर हल्लाबोल आंदोलन सुरू केले आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन सरकारवर टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, अजित पवार, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, भास्कर जाधव, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, चित्रा वाघ यांनी सर्वच प्रश्नांवर सरकारला हादरवण्याचा प्रयत्न चालवला आहे. शेतमालाचे पडलेले भाव, कर्जमाफी, बोंडअळी व गारपिटीची भरपाई, आॅनलाइन कामांमुळे सामान्यांना होणारा त्रास, नोकऱ्यांचा अभाव, बँकांतील घोटाळे, शेतकरी आत्महत्या हे चर्चेतील मुद्दे आंदोलनाचा भाग असला तरी मराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत या समाजाच्या आरक्षण मुद्द्यांवरही हे नेते सरकारवर टीका करीत आहेत. 


जातीच्या आरक्षणाच्या मुद्द्यांवर गुजरातमध्ये निवडणूक लढली गेली आणि भाजपला तेथे फटका बसला. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा राष्ट्रवादीने इथे आपल्या अजेंड्यावर घेतला नसता तर ते आश्चर्यच म्हणावे लागले असते. तसे पाहिले तर यात मुद्दे कोणतेही नवीन नाहीत. हेच मुद्दे त्यांनी आणि काँग्रेस आमदारांनी विधिमंडळाच्या सभागृहात वारंवार मांडले आहेत. आता तेच जनतेच्या सभागृहात हल्लाबोल आंदोलनातून मांडले जात आहेत. राष्ट्रवादीने मराठवाड्यापासून या आंदोलनाला सुरुवात केली. औरंगाबादला स्वत: शरद पवारांनी  फडणवीस सरकारवर सडकून टीका केली होती. राष्ट्रवादीचे हे आंदोलन मराठवाड्यातून उत्तर महाराष्ट्र आणि आता खान्देशात दाखल झाले आहे. हल्लाबोल आंदोलनातून जे प्रश्न मांडले जात आहेत, त्याची दखल घेऊन सरकार तत्काळ प्रश्नांची सोडवणूक करणार आहे का, असा प्रश्न जर कुणी विचारला तर त्याचे उत्तर राष्ट्रवादी नेतेही होकारार्थी देऊ शकणार नाहीत. मग आंदोलन करण्यामागचा हेतू काय, असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर कुणीही सहज देईल आणि ते उत्तर म्हणजे सन २०१९ मध्ये होणारी निवडणूक. सध्या राज्यात आणि देशात सन २०१९च्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. 


सत्ताधारी भाजप आणि सत्तेतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनेही कामाला लागण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. मधल्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करण्याच्या दृष्टीने बैठकही झाली होती. आघाडी होईल तेव्हा होईल; पण भाजप सरकारला अकार्यक्षम ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे हल्लाबोल आंदोलन सुरू केले आहे.  या आंदोलनातील नेत्यांची भाषणे पाहता त्यात निवडणुकीचा प्रचारच अधिक दिसत आहे. गत निवडणुकीनंतर सत्तेपासून दूर राहिलेली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी उतावीळ झाली आहे. राज्यात भाजप सरकार पुन्हा सत्तेवर येत नाही, असा विश्वास त्यांना वाटू लागला आहे. त्यामुळे हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून नेते सरकारवर टीका करताना आपल्या पक्षातून भाजपत गेलेल्यांवरही तेवढ्याच तिखट भाषेत टीका करत आहेत.  खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांतील २० विधानसभा मतदारसंघांपैकी पारोळा (जि. जळगाव) ही एकमेव जागा राष्ट्रवादीकडे आहे. सर्वाधिक १० जागा भाजप, काँग्रेस पाच, शिवसेना तीन आणि एका जागेवर अपक्ष आमदार निवडून आला आहे. 


राज्यात सत्ता मिळवायची असेल तर खान्देशात राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळवाव्या लागणार आहेत. भाजपची ताकद खान्देशात अधिक असली तरी राष्ट्रवादीतून भाजपत गेलेले नंदुरबारचे डॉ. विजयकुमार गावित यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत. मंत्रिपद गेल्यामुळे खडसे सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे बाहेरचे आहेत, त्यांना मिळेल तेवढा वेळच ते जिल्ह्यासाठी देतात. मंत्री गिरीश महाजन यांचे जामनेरकडे अधिक लक्ष आहे. मिळाला वेळ तर तो ते नाशिकमध्ये घालवतात. धुळे जिल्ह्यातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने हल्लाबोल आंदोलनातून निवडणुकीची चाचपणी सुरू केली आहे. काही ठिकाणी तर उमेदवारही अप्रत्यक्षरीत्या घोषित करून टाकले आहेत. आंदोलन यशस्वी करण्याची धुरा ज्यांनी कुणी सांभाळली आहे, ते प्रत्येक तालुक्यातील इच्छुक उमेदवार आहेत. तेच आंदोलनाचा खर्च आणि नेत्यांची बडदास्त ठेवत आहेत. नाराज खडसेंना काँग्रेससह सर्वच पक्षाचे नेते आॅफर देत आहेत. तसे राष्ट्रवादीलाही सत्ता मिळवण्यासाठी खडसेंसारखा नेता हवा आहे. त्यामुळे त्यांचीही खडसेंना आॅफर असणारच. हे नेते खडसेंबद्दल चकार शब्दही बोलत नाहीत.  बोलायचेच असेल तर सहानुभूतीचेच बोल खडसेंबद्दल बोलले जात आहेत. हल्लाबोलचे लक्ष्य केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे ही  आगामी निवडणुकीची तयारीच  असल्याचे जाणवत आहे.
-त्र्यंबक कापडे, निवासी संपादक, जळगाव

बातम्या आणखी आहेत...