आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित कला परीक्षणावरून युवारंग महाेत्सवात वादंग; फेरपरीक्षणासाठी 'मूजे', 'बेंडाळे'महा.चे कुलगुरुंना निवेदन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- युवारंग महोत्सवात यंदा प्रथम ललित कला परीक्षणावरुन जाेरदार वांदग निर्माण झाला. ललित कलेच्या परीक्षणातील अन्यायामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप 'मूजे'तर्फे करण्यात आला आहे. त्यामुळे ललित कलेचे फेर परीक्षण करण्यात यावे, अशी मागणी मूजे व बेंडाळे महाविद्यालयातर्फे कुलगुरू डाॅ.प्रा.पी.पी. पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली अाहे. दरम्यान, महाविद्यालयानी घेतलेल्या हरकतीविषयी बुधवारी बैठक हाेणार असून त्यानंतर फेर परीक्षणाचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे युवारंग प्रमुखांनी सांगितले. 


युवारंग महाेत्सवाचा मंगळवारी समाराेप झाला. यात स्पर्धेच्या ५ पैकी ३ कला प्रकारात मूजे महाविद्यालयास सर्वसाधारण विजेतेपद मिळाले आहे. तर उमवि व बेंडाळे महिला महाविद्यालयास प्रत्येकी एका कला प्रकारात सर्वसाधारण विजेतेपद आहे. अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयास मिळालेल्या क्रमांकावरून त्यांचे पॉइंट्स जास्त असल्यामुळे ते सर्वसाधारण विजेते ठरले. सन २००६ ते २००८ व २०१४ ते २०१६ अशा दोन वेळा हॅटट्रिक, तर आत्तापर्यंत ९ वेळा युवारंगाचे सर्वसामान्य विजेतेपद पटकावणाऱ्या मूजे महाविद्यालयाला या वेळी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. दरम्यान, निकालांची घोषणा झाल्यानंतर समारोपप्रसंगी मूजेचे प्राचार्य डॉ.उदय कुळकर्णी, ओजस्विनी महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश काटे यांच्यासह संघ व्यवस्थापक व स्पर्धक विद्यार्थ्यांनी निकालाविषयी नाराजी व्यक्त केली. कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील, युवारंगचे प्रमुख दिलीप पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांना त्यांनी जागेवरच जाब विचारला. निकालात अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच काही वेळातच लेखी तक्रार केली. ललित कला या प्रकारातील क्ले-मॉडेलिंग, फोटोग्राफी, रांगाेळी, कोलाज व स्पॉट पेंटिंग या स्पर्धेंसाठी तज्ज्ञ परीक्षक नसल्यामुळे परीक्षण व्यवस्थित झाले नाही, काही परीक्षक संघ व्यवस्थापक व विद्यार्थ्यांची चर्चा करीत होते. त्यामुळे या स्पर्धेचे फेर परीक्षण करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन मूजेच्या संघाने कुलगुरू प्रा.पाटील यांना दिले. तर ललित कलेतील क्ले -मॉडेलिंग स्पर्धेसाठी असलेल्या परीक्षकांचा या कलेशी काहीएक संबंध नाही, त्यामुळे तज्ज्ञ परीक्षकांची नियुक्ती करून फेर परीक्षण करावे, असे निवेदन बेंडाळे महाविद्यालयाने दिले. 


माजी अामदारांनी सादर केली कव्वाली
दरम्यान, बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव "छुपे रुस्तम है...' ही कव्वाली सादर केली. त्यानंतर दिलीप पाटील व डॉ.आशा कांबळे व विद्यार्थ्यांच्या वतीने स्वाती पाटील, सारांश सोनार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा.अजय सुरवाडे यांनी केले. प्रा.आशुतोष पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.एस.टी.इंगळे, प्रा. विलास चव्हाण, प्रा.सत्यजित साळवे, प्रा.पंकजकुमार नन्नवरे, प्रा.राम पेटारे यांनी पारितोषिक विजेत्यांची यादी वाचून दाखविली. प्रा.मधुलिका सोनवणे यांनी आभार मानले. 


हरकत घेतलेल्या स्पर्धेचे सादरीकरण खोलीत बंद 
'मूजे', बेंडाळे महाविद्यालयांनी क्ले मॉडेलिंग व अन्य काही स्पर्धांच्या निकालावर हरकत घेतली आहे. सर्व स्पर्धकांनी सादर केलेल्या कलेचे नमुन्यांची छेडछाड होऊ नये म्हणून एका खोलीत बंद करून ठेवले आहेत. बुधवारी बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. दिलीप रामू पाटील, युवारंग प्रमुख 


'जो में बोलता हु वो में करता हूं...' कुलगुरू डाॅ.पाटील यांची डायलॉग बाजी 
कुलगुरू प्रा.पाटील यांनी संवाद साधतांना सांगितले की, मला देखील गाणे म्हणणे, मिमिक्री करणे आदींची आवड होती. मात्र, माझ्यात व्यासपीठावर बोलण्यासाठी लागणारा आत्मविश्वास नव्हता. त्यामुळे माझी आवड फक्त वसतिगृहापर्यंतच मर्यादित राहिली. यानंतर त्यांनी चक्क राऊडी राठोड चित्रपटातील 'जो मैं बोलता हूं वो मैं करता हूँ और जो मैं नही बोलता वो डेफिनेटली करता हूँ...' हा डायलॉग मारून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 

बातम्या आणखी आहेत...