आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आरटीई' प्रवेशासाठी पुन्हा २६ मे ते ४ जूनदरम्यान मुदत; नवीन अर्ज करण्याची संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शिक्षणहक्क कायद्यांतर्गत शाळांमध्ये आर्थिक व दुर्बल घटकांतील मुलांसाठी २५ टक्के राखीव प्रवेशांतर्गत पालकांना आता पुन्हा अर्ज दाखल करण्याची संधी मिळणार आहे. क्षमतेच्या निम्म्यापेक्षाही कमी प्रवेश झाल्याने शासनाने पुन्हा ही संधी उपलब्ध करून दिली आहे. यासंबंधीचे पत्र शिक्षण विभागास प्राप्त झाले आहे. 


या प्रवेश प्रक्रियेत दोन फेऱ्या पार पडल्या असून जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ६३९ विद्यार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण केली आहे. निम्म्याहून अधिक जागा अजून रिक्त असल्याने या जागांवर वंचित विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी, या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे पुन्हा एकदा अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात अाली आहे. त्याअंतर्गत २६ मे ते ४ जून यादरम्यान ऑनलाइन अर्ज करता येतील. त्यानंतर प्रवेशाची तिसरी सोडत काढली जाणार आहे. जिल्ह्यातील २६१ शाळांमधील २ हजार ६५० जागांसाठी सध्या प्रवेशप्रक्रिया राबवली जात आहे. पहिल्या दोन फेऱ्यांतर्गत १ हजार १५१ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यापैकी ६३९ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. 
 


दरम्यान, दुसऱ्या फेरीची मुदत संपली असून पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष आता तिसऱ्या सोडतीकडे लागले अाहेत. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज केलेले नाहीत, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरलेले आहेत, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. यापूर्वी अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज २६ मे ते ४ जून या कालावधीत भरता येणार अाहेत. यानंतर तिसऱ्या सोडतीची प्रक्रिया पार पडणार अाहे, असेही जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 


यांना होईल फायदा 
वंचित घटकांमध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग (ओबीसी), विशेष मागास वर्ग (एसबीसी) तसेच एचआयव्ही बाधित, प्रभावित गटातील मुलांना या प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येईल. या मुलांच्या पालकांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नसेल. जात प्रमाणपत्र आवश्यक असेल. तसेच एचआयव्ही बाधितांना जिल्हा शल्यचिकित्सक तसेच समकक्ष अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक असेल, असेही प्राथमिक शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...