आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- गीतांजली केमिकल कंपनीमधील स्फोटात जखमी झालेल्या १० कर्मचाऱ्यांमधील अाणखी एका कर्मचारी धनराज ढाके यांचा रविवारी मध्यरात्री मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे अाता मृताची संख्या पाच झाली अाहे. जखमींमधील एका कर्मचाऱ्याची प्रकृती ठिक झाल्याने त्याला घरी पाठवण्यात अाले तर उर्वरित चार कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू अाहेत. मृत कर्मचाऱ्याच्या नातेवाइकांना भरीव मदत मिळावी, अशी मागणी हाेत असून कंपनीने मदतीचे आश्वासन दिले अाहे. दरम्यान, कंपनीने सध्या फक्त ८० कायम कर्मचाऱ्यांचे पगार सुरू ठेवले असून उर्वरित रोजंदारी, ठेकेदारी पद्धतीच्या कर्मचाऱ्यांचे पगार बंद आहेत. त्यामुळे सुमारे २०० कामगारांचा राेजगाराचा प्रश्न उभा राहिला अाहे. कंपनीची चौकशी सुरू झाल्यामुळे आता पुन्हा उत्पादन सुरू करण्याची परवानगी कधी मिळेल, हे निश्चित नसल्याने कामगारांच्या अडचणींत वाढ झाली आहे.
एमआयडीसीत सनी मोहता आणि गीतांजली मोहता यांच्या मालकीची गीतांजली केमिकल कंपनी ही सन १९८४ मध्ये सुरू झाली. ३३ वर्षांत या कंपनीत अातापर्यंत ३ मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये आत्तापर्यंत ९ जणांचे मृत्यू झाले आहेत. तर ७ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या स्फोटात १० जण जखमी झाले. यात गेल्या चार दिवसांत गणेश साळी, योगेश नारखेडे, ज्ञानेश्वर पाटील व नीलेश कोळी व रविवारी मध्यरात्री १ वाजता मुंबई येथील खासगी रुग्णालयात धनराज शालिक ढाके (वय ४६, रा.गोपाळपुरा) यांचा मृत्यू झाला. त्यामुळे अाता मृतांची संख्या पाच झाली अाहे. स्फोटात धनराज ढाके हे ५५ टक्के भाजले होते. त्यांच्या पश्चात पत्नी सरला, विवाहित मुुलगी पल्लवी नारखेडे, मुलगी करिश्मा (वय १९) व मुलगी दीपाली (वय १२) असा परिवार आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजता त्यांचा मृतदेह गोपाळपुरा येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ७ वाजता अंत्ययात्रा निघणार आहे.
दरम्यान, स्फोटामुळे सुमारे २ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज काढण्यात आला आहे. त्यामुळे नूतनीकरणासाठी देखील कोट्यवधी रुपयांची गरज भासणार आहे. तर दुसरीकडे स्फोटात मृत्यू, जखमी झालेल्यांना अद्याप अपेक्षित मदत न मिळाल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
सहा जणांवर गुन्हा
दुर्घटनेनंतर गीताजली कंपनी व्यवस्थापनातील ६ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच एमआयडीसी, एसआयटी, आयबीकडूनदेखील वेगवेगळ्या प्रकारची चौकशी सुरू झाली आहे. या चौकशींमध्ये क्लिनचीट मिळाल्यानंतर कंपनी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार
कंपनीतील स्फोटप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ८ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पाच जखमींचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे आता दाखल गुन्ह्यात मनुष्यवधाचे कलम वाढवले जाणार आहे. यासाठी एमआयडीसी पोलिसांचे एक पथक मुंबई येथे जाऊन मृत कर्मचाऱ्यांचे कागदपत्र हस्तगत करणार आहेत. कागदपत्र मिळताच मनुष्यवधाचे कलम वाढवले जाईल, अशी माहिती पोलिसांनी 'दिव्य मराठी'शी बाेलताना दिली.
कर्मचाऱ्यांच्या उपचाराचा खर्च कंपनीकडून
स्फोटात जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या उपचाराचा खर्च कंपनीकडून केला जातो आहे. तसेच मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. मृतांच्या वारसंाना नोकरी, शिक्षणासाठी मदत केली जाणार आहे.
- आबा पाटील, मृत ज्ञानेश्वर पाटील यांचे सासरे
कंपनी बंद करावी या मागणीसाठी निवेदन
स्फोटानंतर ही कंपनी कायमस्वरूपी बंद करावी, यासह अनेक मागण्यांसाठी स्थानिक रहिवासी विठ्ठल पाटील, महेंद्र पाटील यांनी जिल्हाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर यांना निवेदन दिले आहे. यात जखमी व मृतांच्या वारसांना ५ ते ८ लाख रुपयांची मदत द्यावी, दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, कंपनीचे लोकेशन बदलावे किंवा कायमस्वरुपी बंद करावी, कंपनीची नियमित तपासणी करावी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासंदर्भात योग्य ती काळजी घेतली जावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
कायम कर्मचाऱ्यांचे पगार सुरू
सध्य:स्थितीत कंपनीत सुमारे २८० कर्मचारी नोकरीस आहेत. यातील ८० कायम कर्मचारी असून उर्वरित कर्मचारी रोजंदारी, ठेकेदारी पद्धतीने कामे करीत आहेत. स्फोट झाल्यानंतर संपूर्ण मशिनरी, स्ट्रक्चर उद्ध्वस्त झाल्याने उत्पादन कार्य बंद पडले आहे. त्यामुळे सध्या फक्त कायम कर्मचाऱ्यांचे पगार सुरू आहेत. २०० रोजंदारी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. यातील अनेक कामगारांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. ३०० ते ३५० रुपये रोजाने हे कामगार गीतांजली केमिकलमध्ये काम करून कुटुंबाचा गाडा हाकत होते. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे आता त्यांच्या हातचे काम हिरावून गेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारी व उपासमारीची वेळ आली आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना अद्याप मदत, भरपाई नाही
गीतांजली केमिकल ही मोठी कंपनी आहे. जळगाव व्यतिरिक्त इतर मोठ्या शहरांमध्ये प्लांट आहेत. कंपनीत कामावर असताना स्फोट झाल्यामुळे जखमी तसेच मृत कर्मचाऱ्यांना तत्काळ मदत मिळणे अपेक्षित होते; परंतु अद्याप आर्थिक मदत किंवा भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या कंपनीत कामास असलेले वरिष्ठ कर्मचाऱ्यांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. अत्यंत कमी व अप्रशिक्षित मनुष्यबळात स्थानिक व्यवस्थापन काम करून घेत आहे. कँटलवर पडणारा दबाव तपासण्यासाठी तांत्रिक कर्मचारी नसल्यामुळे हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कमी मनुष्यबळात जास्त काम करून घेण्याच्या घातक प्रकारामुळे हा स्फोट झाल्याचा आरोप आजी-माजी कर्मचाऱ्यांनी केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.