आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मकरा काका-पुतण्याची दमबाजी, काॅलर पकडून पोलिसाला ढकलले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- राजकमल चौकात दुकानात माल टाकणारा ट्रक आणि कारची बेशिस्त पार्किंग केल्याबद्दल कारला जॅमर लावून कारवाई करताच पित्त खवळलेल्या मकरा काका-पुतण्याने वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालून गोंधळ घातला. 'तुम कुछ बिगाड नही सकते,' अशा शब्दात दमबाजी करून पुतण्याने एका वाहतूक पोलिसाची कॉलर पकडून त्याला ढकलून दिले. इतर पोलिसांशीही हुज्जत घालून धक्काबुक्की केली. शनिवारी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी ही घटना घडली. हा वाद वाढतच गेला. कार जप्त करून पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात आणली. अखेर पोलिस ठाण्यापर्यंत प्रकरण जाताच शहरातील काही प्रतिष्ठित मंडळी शहर पोलिस ठाण्यात धडकली. गुन्हा दाखल करू नये म्हणून प्रत्येक जण समझाेत्याची भाषा करीत होता. परंतु दाब-दबावाला न जुमानता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे नाट्य सुरू होते. दोघांनाही पोलिसांनी नोटीस बजावली. त्यानंतर हे प्रकरण निवळले. 


अब्दुल कादिर शब्बीर मकरा (वय २८) व युसूफ नुरोद्दीन मकरा (वय ६२, दोघे रा.पोलनपेठ) यांनी वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी १२.४५ वाजता राजकमल चौकात वाहतुकीची कोंडी झाल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांना फोनवरून दिली. त्यानुसार शिंपी यांच्यासह पेट्रोलिंग करणारे धनराज पाटील, भरतसिंग पाटील, विनोद चौधरी, राहुल पाटील हे कर्मचारी राजकमल चौकात पोहचले. तेथे एक ट्रक (एमएच ०४ एचए ३६७५) भररस्त्यात उभा करून त्यातील माल एका दुकानात उतरवण्याचे काम सुरू होते. तर याच ट्रकच्या पुढे एक चारचाकी (एमएच १९ एएक्स ९५५२) उभी होती. या दोन्ही वाहनांनी रस्त्यावर बेशिस्तपणे पार्किंग केल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे पोलिसांचे पथक वाहनांजवळ येऊन विचारपूस करीत होते . त्या वेळी ही वाहने मकरा एजन्सीजची असल्याचे अब्दुल याने पोलिसांना सांगितले. कारवाईसाठी पोलिसांनी चारचाकीला जॅमर लावले होते. याचा राग आल्यामुळे अब्दुल कादिर व युसूफ मकरा यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यात अब्दुल याने धनराज पाटील यांच्या शर्टची कॉलर पकडून त्यांना ढकलले. तर इतर कर्मचाऱ्यांशीही धक्काबुक्की केली. 


'तुम पोलिस लोग अभी तक कहा गये थे, तुम खाली पैसे जमा करने के पीछे रहते हो, ट्रॅफिक जाम होती तभी आते हो, तुम मेरा कुछ नही बिगाड सकते,' अशा भाषेत दोघांनी पोलिसांशी हुज्जत घातली. अखेर पोलिसांनी चारचाकी जप्त करून शहर पोलिस ठाण्यात आणली. धनराज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अब्दुल कादिर व युसूफ मकरा यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


दरम्यान, मकरा यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री ७ वाजेपर्यंत प्रतिष्ठित नागरिकांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. यामुळे पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे देखील पोलिस ठाण्यात आले होते. अखेर रात्री दोघांना नोटीस देण्यात आली. 


कारला जॅमर लावल्याचा राग आल्यामुळे हुज्जत 
चारचाकीस जॅमर लावल्याचा राग आल्यामुळे मकरा कुटुंबातील काही सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत पोलिसांशी हुज्जत घातली. पोलिसांसोबत वाद सुरू असताना मोबाइलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील त्यांनी केली आहे. तसेच या रस्त्यावर अनेक दुकानांच्या बाहेर वाहने उभी असतात. यातील काही दुकाने राजकीय लोकांची अाहेत. त्यांच्यावर पोलिस कधीच कारवाई करीत नाहीत, असा आरोपही मकरा यांनी घटनास्थळी केला. 


दुकानातून बाहेर येण्यास नकार 
पोलिसांनी जॅमर लावल्यानंतर दंड भरण्यासाठी अब्दुल कादिर यांना दुकानातून बाहेर बाेलावले. अब्दुल यांनी बाहेर येण्यास नकार दिला. 'माझ्या वकिलांशी बोला,' असे त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांनी फोन करून बोलावल्यानंतर देखील त्यांनी नकार दिला. अखेर पुन्हा शिंपी पथकासह राजकमल चौकात गेले. त्यांनी चारचाकी जप्त केली. यानंतर काही वेळात शहर पोलिस ठाण्यात एक वकील आले होते. त्यांनी मकरा यांची बाजू मांडली. गुन्हा दाखल करू नये, यासाठी वकिलांसह आणखी काही प्रतिष्ठित लोकांनी देखील पोलिस ठाण्यात येऊन विनंती केली. परंतु, वाहतुकीचे नियम मोडून कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी धक्काबुक्की केल्याने सागर शिंपी यांनी सर्वांची विनंती अमान्य करून गुन्हा दाखल केला. त्यानंतर सायंकाळपर्यंत मकरा काका-पुतणे अाणि प्रतिष्ठीत नागरिक समझाेत्यासाठी प्रयत्न करीत हाेते. 

बातम्या आणखी आहेत...