आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नासाठी पैसा नसल्याने बाप-लेकीने घेतले विष; मुलीचा मृत्यू, पिता गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मुलीच्या लग्नासाठी आर्थिक विवंचनेमुळे वडिलांनी शेतात विष प्राशन केले. ही बातमी कळताच दु:खाच्या डाेंगर काेसळलेल्या मुलीनेही तासाभरातच विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली. जळगाव जिल्ह्यातील दापोरा येथे शनिवारी ही घटना घडली होती. या दोघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उपचारादरम्यान मुलीची प्राणज्योत मालवली तर वडिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. भाग्यश्री लाला तांदळे (वय १७) असे मृत मुलीचे नाव आहे. ती शिरसोली प्र.बो.येथील जगतराव बापू पाटील विद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती. घटनेबाबत मुलीचे अजोबा भानुदास बाबुराव तांदळे यांनी सांगितले की, ‘भाग्यश्री हिला  काही स्थळे आली होती. तिचे यंदा लग्न करावयाचे, असे तिच्या आईचे म्हणणे होते. मात्र, व्यवसायाने शेतकरी असलेले मुलीचे वडील लाला तांदळे यांची यंदा लग्न करण्याची आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. चांगला शेतमाल झाल्यानंतर पुढील वर्षी लग्न करू,असे त्यांचे म्हणणे होते. मात्र अाईला ते मान्य नव्हते. मुलीच्या लग्नावरून पती- पत्नीमध्ये वाद झाले. आर्थिक विवंचनेमुळे मुलीचे लग्न करता येत नसल्याच्या विवंचनेतून लाला यांनी शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास लमांजन शिवारातील शेतात विष प्राशन केले. या प्रकाराबाबत कळाल्यानंतर भाग्यश्रीनेही घरात विष प्राशन करून स्वत:चे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान भाग्यश्रीची प्राणज्योत मालवली. साेमवारी हा प्रकार उजेडात अाला.  


मुलीवर अंत्यसंस्कार, वडील रुग्णालयात
सोमवारी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास भाग्यश्रीवर दापोरा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी तिचे वडील लाला हे जिल्हा रुग्णालयात होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. मुलीचा मृत्यू झाल्याबाबत त्यांना नातेवाइकांनी माहिती दिली नाही. भाग्यश्रीच्या मृत्यूमुळे ती शिक्षण घेत असलेल्या शिरसोली प्र.बो.येथील विद्यालयाला साेमवारी सुटी देण्यात आली हाेती.

बातम्या आणखी आहेत...