आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जप्त केलेली हातगाडी सोडवण्यासाठी पालिकेत महिलेने घेतले ब्लेड मारून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिकेतर्फे शहरात अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू अाहे. पथकाने सोमवारी जप्त केलेली हातगाडी सोडवण्यासाठी महिला मंगळवारी सकाळी ११ वाजता पालिकेत अाली. या वेळी अधिकाऱ्यांकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने महिलेने जबरदस्तीने हातगाडी घेऊन जाण्यासह एका हातात ब्लेड घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात झालेल्या झटापटीत मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या तीन महिला किरकोळ जखमी झाल्या. दरम्यान, महिला कर्मचाऱ्यांनी आपणास मारहाण केल्याचा आरोप हॉकर्स महिलेने केला आहे. 

 

शाहू महाराज रुग्णालय परिसरात गायत्री कैलास पवार ह्या हातगाडीवर पराठे विक्रीचा व्यवसाय करतात. सोमवारी दुपारी १.३० वाजता अतिक्रमण विभागाच्या पथकाने त्यांची हातगाडी जप्त केली. त्यामुळे बेरोजगार झालेल्या पवार ह्या मंगळवारी सकाळी ११ वाजता हातगाडी सोडवण्यासाठी महापालिकेत आल्या. सुरुवातीला त्या उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांना भेटल्या. कहार यांनी हातगाडी सोडण्यास नकार देत आयुक्तांना भेटण्याचा सल्ला पवार यांना दिला. त्यामुळे संतापलेल्या पवार यांनी पार्किंगमध्ये उभी केलेली हातगाडी घेऊन जाण्यास सुरुवात केली. सुरक्षारक्षकांनी त्यांना राखले. त्यानंतर कहार यांच्यासह अतिक्रमण विभागाचे पथकही तेथे दाखल झाले. हातगाडी घेऊन जाण्याचा हट्ट पवार यांनी धरला. या वेळी महिला कर्मचारी माया भक्तराज गोयर, रेहानाबी शेख तस्लीम व लक्ष्मी भागवत जावळे यांच्यासोबत धक्काबुक्की झाली. कर्मचाऱ्यांनी हातगाडीवर बसलेल्या पवार यांना ओढून बाजूला केले. यानंतर पवार यांनी हातात ब्लेड घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. झटापटीत तीन महिला कर्मचारी व पवार किरकोळ जखमी झाल्या. हा संपूर्ण थरार सुरू असताना उपायुक्त कहार हे देखील घटनास्थळावर होते. वाद मिटवल्यानंतर पवार यांच्यासह अतिक्रमण विभागाचे कर्मचारी शहर पोलिस ठाण्यात पोहचले. तेथे अतिक्रमण विभागाचे अधिकारी एच. एम. खान हे देखील हजर झाले. याप्रकरणी परस्पर विराेधी अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात अाले अाहे. 
दुपारी १२ वाजता घाणेकर चौकात हॉकर्स व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा वाद 
पालिकेच्या पार्किंगमधला वाद शहर पोलिस ठाण्यात पोहचला. त्यावर उपाययोजना हाेत नाही तोपर्यत दुपारी १२ वाजता घाणेकर चौकात हॉकर्स व अतिक्रमण कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा दुसऱ्यांदा वाद झाला. टॉवर चौकाकडून घाणेकर चौकाकडील अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू असताना हा वाद झाला. घाणेकर चौकात पथक कारवाईसाठी आल्यानंतर शैलेंद्र सपकाळे यांनी कर्मचाऱ्यांना ओळखपत्राची मागणी केली. मनपाच्या कायम कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र दाखविले. परंतु, त्यानंतर मक्तेदाराकडील कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र तपासले असता, केवळ एका कोऱ्या कागदावर फोटो चिकटवलेला त्यांना दिसला. त्याच्या जाब विचारल्यावरून वादास सुरूवात झाली. शनिपेठ भाग हा हॉकर्समुक्त परिसर नाही. त्या परिसरात हॉकर्सला बंदी घालण्यात आलेली नाही. तरीही हॉकर्सवर कारवाई करण्यात येत असते. माहितीच्या अधिकारात मागविलेल्या माहितीमध्ये देखील ही बाब उघड झाली आहे, असे सपकाळे यांनी सांगितले. शिवीगाळ झाल्यामुळे अतिक्रमणच्या पथकाने शनिपेठ पोलिस ठाणे गाठले. या घटनेनंतर शनिपेठ पोलिस ठाण्यात माेठी गर्दी झाली होती. दरम्यान, अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांचा सपकाळे यांनी शिवराळ भाषेत उल्लेख केला,असा आरोप पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केला. तर आपली चूक झाकण्यासाठी शिवीगाळ केल्याचा उलट अारोप कर्मचारी करीत असल्याचे सपकाळे म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...