आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीला वागवण्यास नकार; पित्याचा हृदयविकाराने मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - अवघ्या महिन्याभरापूर्वी विवाह झालेल्या मुलीला जावयाने वागवण्यास नकार दिल्याने मुलीचा संसार उद््ध्वस्त होणार असल्याच्या धास्तीने मुलीच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान मुलासह त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नवविवाहितेच्या नातेवाइकांनी केल्याने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गोंधळ होऊन   तणाव निर्माण झाला होता. 

नातेवाइकांनी दिलेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील धामणगाव येथील रामदास हिंमत चव्हाण (वय ६०) यांची मुलगी रुपाली हिचा मागील महिन्यात २८ एप्रिल रोजी जळगाव तालुक्यातील नांद्रा येथील भिकन वाघ यांचा मुलगा दीपक याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर लगेचच दीपक याने मुलगी आवडत नसल्याचे सांगून तिला माहेरी पाठवून दिले होते. दरम्यान, नातेवाइकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. तर रविवारी दुपारी गाडगेबाबा उद्यानात समाजाच्या नागरिकांची बैठक झाली. दीपकचे व मुलीचे नातेवाईक उपस्थित होते. दीपक याने सर्वांसमोर मुलगी आवडत नसल्याचे सांगून ५० हजार घेऊन अन् लग्न मोडा, असे सांगितले. यावर समाजातील नागरिकांनी पुन्हा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावर दीपक याने मी वकिलाकडे कामाला आहे. मला सर्व माहित आहे. माझे काही होणार नाही, अशी धमकी दिली. 


गुन्हा दाखल करण्याची मागणी 
मुलीचा संसार मोडण्याच्या धास्तीने रामदास चव्हाण यांचा मृत्यू झाल्याने दीपक वाघ याच्यासह त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नातेवाइकांसह नगरसेवक अनिल देशमुख, शिवसेनेच्या शोभा चौधरी, वंदना पाटील, रेखा पाटील, राहुल नेतलेकर यांनी केली. मात्र, पाेलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला हाेता. त्यामुळे जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गोंधळ निर्माण होऊन तणाव झाला होता. या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप आराक यांनी नातेवाइकांची समजूत घालून शवविच्छेदनाच्या अहवालानंतर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, या वेळी रुपाली हिला पोलिस ठाण्यातच भोवळ आली होती. 


नातेवाइकांचा अाक्राेश 
महिन्याभरापूर्वीच झालेले मुलीचे लग्न मोडणार असल्याची धास्ती घेतल्याने रुपाली हिचे वडील रामदास हिंमत चव्हाण यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तत्काळ नातेवाइकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना रविवारी सायंकाळी रामदास चव्हाण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या वेळी नातेवाइकांनी आक्रोश केला. 

बातम्या आणखी आहेत...