आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीची छेड काढल्यावरून विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी, एका विद्यार्थ्यांचे डोके फुटले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - विद्यार्थिनीचे नाव घेऊन छेड काढल्याच्या कारणावरून मंगळवारी दुपारी नूतन मराठा महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि जैनाबाद येथून आलेल्या तरुणांच्या टोळक्याची भर रस्त्यावर हाणामारी झाली. यात एका विद्यार्थ्याचे डोके फुटले. त्यानंतर महाविद्यालयातील दीडशे ते दोनशे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यांनीही बाहेरून आलेल्या टोळक्याचा पाठलाग करून मारहाणीची परतफेड केली. नूतन मराठा महाविद्यालय ते गणेश कॉलनीपर्यंत विद्यार्थ्यांचा हा धिंगाणा दुपारी तासभर सुरू होता. अखेर पोलिस आल्यानंतरच विद्यार्थ्यांची पांगापांग झाली.

 

मंगळवारी दुपारी १२ वाजता नूतन मराठा महाविद्यालयासमोर मुलीचे नाव घेतल्याच्या विषयावरून हाणामारी झाली. सुरुवातीला विद्यार्थ्यांमध्ये असलेला हा वाद अधिकच वाढत गेला. त्यानंतर जैनाबाद येथून तरुणांचे एक टोळके तिथे आले. त्यानंतर पुन्हा हाणामारी सुरू झाली. या टोळक्याने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये एक टणक वस्तू लागून दिनेश पाटील या विद्यार्थ्याचे डोके फुटले. रस्त्यावर मारहाण आणि पळापळ सुरू होती. हे पाहून रस्त्यावरही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

 

मारहाणीमध्ये दिनेशचे डोके फुटल्याचे पाहून त्याचे मित्र मदतीला धावले; पण ताेपर्यंत हाणामारी करणारे पळून जात होते. हे पाहताच नूतनच्या विद्यार्थ्यांनी जैनाबादहून आलेल्या टोळक्यातील तरुणांचा पाठलाग केला. गणेश कॉलनीपर्यंत विद्यार्थी त्यांच्या मागे धावत होते. टोळक्यातील काही तरुण रिक्षामध्ये बसून पळून गेले तर त्यापैकी काही तरुणांना विद्यार्थ्यांनी मारहाण केली. विद्यार्थ्यांमधील हाणामारीमुळे रस्त्यात वाहतुकीचीही कोंडी झाली होती. हाणामारीचे प्रकरण चिघळू नये हे पाहून काही नागरिकांनी जिल्हापेठ पोलिसांना फोन करून घटनेबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांचे पथक तिथे अाले. त्या वेळी दिनेश महाविद्यालयात बसून होता. पोलिसांनी त्याला घटनेबाबत विचारपूस करून त्याला उपचारासाठी सिव्हिलमध्ये पाठवले. दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करीत असताना डोक्यात मार लागल्याचे जखमी विद्यार्थी दिनेश पाटील याने सांगितले.

 

शहरातील महाविद्यालय परिसरात गेल्या काही दिवसांपासून हाणामारीच्या घटनांमध्ये माेठ्या प्रमाणात वाढ झाली अाहे. तसेच मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले अाहे. या घटनेमुळे टवाळखाेरांच्या उपद्व्यापामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम हाेत अाहे. हे प्रकार थांबविण्यासाठी महाविद्यालयाच्या परिसरात पाेलिस दलाच्या निर्भया पथकाने नियमित गस्त घालण्याची मागणी अाता जाेर धरू लागली. यापूर्वी निर्भया पथक महाविद्यालयाच्या परिसरात दिवसातून दाेनवेळा गस्त घालत हाेते. या वेळी ते टवाळखाेरांना हटकत असते. त्यामुळे पथकाचा टवाळखाेरांवर वचक हाेता; पण सध्या पथकाची गस्त कमी झाल्याने असे प्रकार घडत अाहे.

 

यापूर्वीही हाणामारी
तीन ते चार महिन्यांपूर्वीही विद्यार्थिनीची छेड काढल्याच्या विषयावरून ‘नूतन’चे विद्यार्थी जैनाबाद येथील तरुणांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर जैनाबाद येथील शंभर ते दीडशे युवकांनी थेट महाविद्यालयात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. या वेळी दगडफेकही झाली होती. या घटनेनंतर महाविद्यालयात मोठा तणाव निर्माण झाला होता. महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. या घटनेनंतर विद्यार्थ्यांना पोलिस संरक्षणात बाहेर काढण्यात आले होते. 

बातम्या आणखी आहेत...